Breaking News

फळे, भाज्या निर्यातीला निर्बंधांचा फटका

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

उन्हाळ्यात फळांचा हंगाम असतो. या फळांना जशी देशात मागणी असते तशीच विदेशातही असते. त्यामुळे या काळात फळांच्या बाजारातही तेजीचे वातावरण पाहायला मिळते, परंतु यंदा वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि कडक निर्बंध यांमुळे फळांसह भाज्यांची आयात-निर्यात थांबली.

सध्या भाज्यांसह फळांची निर्यात सुरू असली तरी लॉकडाऊनचा 30 ते 35 टक्के परिणाम निर्यातीवर झाला आहे. निर्यातीसाठी लागणारे अन्य साहित्यही लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नसल्याने त्याचाही परिणाम जाणवतो आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू असला तरी, त्याच्याशी संबंधित अन्य व्यवसाय मात्र बंद आहेत. आता मे महिना आणि त्यातही रमजानचा महिना सुरू असल्याने दुबई, कतारसारख्या आखाती देशातून फळांना मोठी मागणी आहे. यात कोकणातील हापूस आंब्यासह अन्य सर्व जातींचे आंबे, टरबूज, कलिंगड, पपई यांचाही समावेश आहे. त्यानुसार हवाई आणि समुद्री मार्गाने निर्यात सुरू आहे. मात्र त्यात निर्यातदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निर्यातीसाठी जाणार्‍या फळांचे, भाज्यांचे योग्य पद्धतीने पॅकेजिंग करावे लागते. बॉक्समध्ये कागदाचा लगदा, पेपर यांची गरज भासते. बॉक्स चिकटवण्यासाठी चिकटपट्या लागतात, त्यादेखील मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या आवश्यक गोष्टी हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पॅकेजिंगमध्ये अडचणी येत आहेत. हे साहित्य तयार करणारे लहानसहान कारखाने सध्या बंद असल्याने त्यांचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे त्यांचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळेही निर्यातीत अडचण येत आहे. नेहमी होणार्‍या एकूण फळांच्या निर्यातीपेक्षा आता 60 ते 65 टक्के निर्यात सुरू आहे. त्यातही अडचणी वाढल्या तर व्यापारी आणि पर्यायाने शेतकर्‍यांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पॅकेजिंगचे साहित्यही महागले

या सर्वांच्या वाहतुकीच्या भाड्यामध्ये सरासरी 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. तर, निर्यात करण्यासाठी लागणारे पॅकेजिंगचे साहित्य उपलब्ध होत नसल्यानेही अडचणी वाढल्या आहेत. पॅकेजिंगसाठी लागणारे पुठ्ठे, कागदाच्या किमतीतही 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे तोही खर्च वाढला आहे. किमतीत वाढ होऊनही त्यांचा पुरवठा होत नसल्याने या अडचणींत भर पडल्याचे निर्यातदार मोहन डोंगरे यांनी सांगितले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply