Breaking News

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी सलग तिसर्‍यांदा मोठा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून लढणारे काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. नवी मुंबईतील नेरूळ येथे सोमवारी (दि. 1) मतमोजणी झाली.
आमदार डावखरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती तसेच त्यांना विविध संस्था, संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार डावखरे, तर रमेश कीर हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्याचप्रमाणे इतरही उमेदवार असले तरी मुख्य लढत डावखरे आणि कीर यांच्यात होती. यामध्ये डावखरेंनी किर यांना एकतर्फी मात दिली.
या निवडणुकीत एकूण एक लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी एक लाख 32 हजार 71 मते वैध, तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 36 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. यामध्ये आमदार निरंजन डावखरे हे पहिल्या पसंतीची एक लाख 719 मते मिळवून विजयी झाले. रमेश कीर यांना अवघी 28 हजार 585 मते पडली.
आमदार निरंजन डावखरे 2012पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते यंदा सलग तिसर्‍यांदा निवडणूक लढवत होते. त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply