Breaking News

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी
मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको. नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले, पण आम्ही कामातून, कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला पाच वर्ष भोंगा लावून बोंबलण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. 30) येथे केले.
कर्जतच्या शेळके बंधू साईकृपा सभागृहात महायुतीच्या वतीने तिसर्‍यांदा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आमदार महेंद्र थोरवे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल डाळिंबकर, भाई गायकर, हिरामण गायकवाड, मनोहर थोरवे, वसंत भोईर, विजय पाटील, पंकज पाटील, दीपक बेहेरे, अशोक ओसवाल, संभाजी जगताप, संदेश पाटील, राजेश भगत आदी उपस्थित होते.
संभाजी जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राहुल डाळिंबकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. मग संतोष भोईर यांनी मनोगतात, आपल्याला उर्वरित चार महिन्यांमध्ये महायुतीचा आमदार निवडून द्यायचा आहे याची खूणगाठ बांधा, असे स्पष्ट केले. नरेंद्र गायकवाड यांनी, चांगला खासदार आपल्याला लाभला आहे. तळागाळातील लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे, पण विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. संविधान, मुस्लिमांबाबत संभ्रम निर्माण केला, असे सांगितले. वसंत भोईर यांनी, आपण कमी कोठे पडले ते शोधा, असे म्हटले.
अविनाश कोळी म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत यश मिळविणारे म्हणजे आपले खासदार अप्पा बारणे आहेत. त्यांनी कधीही पराजय पहिला नाही, तर आमदार महेंद्र थोरवे यांनी, राज्याची राजकीय परिस्थिती आपल्याला माहीत होती. विरोधकांनी रडीचा डाव खेळला आहे, असा हल्लाबोल केला. सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply