अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले.
बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा पेण नगर परिषदेचे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील व त्यांच्या टीमने शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी शेलार यांनी आरडीसीएच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
रायगड हा मुंबई व पुण्यालगत असलेला जिल्हा आहे. अनेक गुणवान व होतकरू खेळाडू रायगड जिल्ह्यात आहेत. त्यांना योग्य संधी मिळवून देणे व भविष्यात रायगडातील गुणवंत खेळाडू महाराष्ट्राच्या व देशाच्या संघात खेळावेत या दृष्टीने आपण जिल्हा क्रिकेट असोसिएशनला लागेल ती मदत करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी आपल्या हक्काचे मैदान मिळावे, अशी मागणी अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी केली असता शेलार यांनी नियोजित प्रस्ताव व शासनाचा क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचा अहवाल आपण द्यावा, त्याप्रमाणे आपण योग्य तो निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत घेऊ, असे आश्वासन शेलार यांनी दिले.
या वेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, हुसेन तांबोळी, प्रवीण वानखेडे आदी उपस्थित होते.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …