प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका आजपासून दै. राम प्रहरमध्ये क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत…
महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची कास धरून सामान्य माणसाचे, शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे प्रश्न पोटतिडकीने शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरदेखील ज्यांना संघर्ष करावा लागला, त्या नेत्यांमध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
दि. बा. पाटील यांचे सारे आयुष्य संघर्ष करण्यात गेले. हा संघर्ष सामान्य जनतेसाठी होता, कष्टकरी, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांसाठी होता. त्यामुळे जिथे संघर्ष तिथे ‘दिबा’ आणि जिथे ‘दिबा’ तिथे संघर्ष असे समीकरणच जणू बनले होते.रस्त्यावरच्या संघर्षाबरोबरच त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने विधिमंडळात केलेला संघर्ष सार्या महाराष्ट्राने पाहिला आहे, तर रस्त्यावरच्या संघर्षात पोलिसांचा मार खाऊन प्रसंगी जनहितासाठी रक्तही सांडले आहे, पण त्यांनी संघर्षातून कधी माघार घेतली नाही. उलट नव्या जोमाने, तेजाने आणि त्वेषाने हा संघर्ष ते लढत. ते नेहमी म्हणायचे, आंदोलन करतानाच जर मला मरण आले, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. यामागे त्यांची लोकांप्रति असलेली सद्भावना, शेतकरी प्रकल्पग्रस्तांविषयी असणारा जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळतो.
पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दि. बा. पाटील यांनी विधिमंडळात सामान्य माणसाचे अनेक प्रश्न मुद्देसूदपणे मांडले. ते मांडताना त्यांची आक्रमकता, शासनाला पटवून देण्याची रीत विरोधी पक्षाचे आमदारही लक्षपूर्वक पाहत. ते बोलायला उभे राहिले की सारे सभागृह स्तब्ध होत असे. मुख्यमंत्रीही त्यांचे भाषण एकाग्रतेने ऐकून घेत. कारण ते भाषण नुसते टीकात्मक नसे, तर सरकारला सूचनात्मकही असे.
दि. बा. पाटील यांना महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, आर्थिक तसेच विकासात्मक प्रश्नांची जाण होती. महागाईविरोधी, दुष्काळग्रस्त परिस्थिती किंवा राज्याचा अर्थसंकल्प वा मंडल आयोग या विषयावरील त्यांची भाषणे सरकारला अंतर्मुख करणारी होती. म्हणूनच 17 डिसेंबर 1996 रोजी संसदेच्या राष्ट्रकुल संघाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे प्रथमच सुरू करण्यात आलेल्या विधान परिषदेतील उत्कृष्ट वक्त्याचा प्रथम पुरस्कार दि. बा. पाटील यांना देण्यात आला.
‘दिबा’ हे जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षशील नेते होते. जनजागृती करून लोक चळवळ उभारणे आणि ती यशस्वी करून दाखवणे हा त्यांचा पिंड होता. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असत. त्या चळवळीच्या व्यवस्थापनाच्या बारीकसारीक गोष्टींतही ते स्वतः लक्ष घालत. त्यामुळे कार्यकर्तेही जिद्दीने व चिकाटीने कामाला लागत.
अनेक वर्षे आमदार व खासदार तसेच लोक चळवळीत अग्रभागी असल्याने दि. बा. पाटील यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. लोकांचेही त्यांच्यावर जिवापाड प्रेम होते. त्यांचा शब्द कार्यकर्त्यांमध्ये अंतिम असायचा.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, सीमा प्रश्नाचे आंदोलन असो किंवा महागाईविरोधी मोर्चा असो या सार्या चळवळीत ‘दिबां’नी स्वतःला झोकून दिले होते. 1984 साली जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला व सार्या देशभर गाजलेला शौर्यशाली व गौरवशाली लढा हा त्यांच्या जीवनातील परमोच्च बिंदू होता. प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी दिलेले लढे अभूतपूर्व असे होते.
25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्यामुळे देशवासीयांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी सुरू झाली. याविरोधात अनेक ठिकाणी जनआंदोलन सुरू झाले. पनवेल शहरात दि. बा. पाटील यांनी आणीबाणीविरोधात बंद पुकारला. त्यामुळे इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांनाही अटक करून पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकण्यात आले, पण तेथेही त्यांनी इतर राजकीय कैद्यांना सवलती मिळाव्यात यासाठी संघर्ष केला.
1982-83 साली दि. बा. पाटील विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्याच दरम्यान महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून त्यांनी दुष्काळ निवारणासाठी अनेक विधायक व उपयुक्त सूचना सरकारला केल्या.
1977 व 1984मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. देशाच्या या सर्वोच्च सभागृहात महाराष्ट्र व देशपातळीवर अनेक प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात दौरे काढून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजात लोकजागृती केली.
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाने सुचविलेल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील शिफारशीच्या अंमलबजावणीची घोषणा केली, त्या वेळी काही प्रतिगामी शक्तींनी गुजरातमध्ये जाळपोळ व दंगली सुरू केल्या. हे लोण महाराष्ट्रात पसरू नये यासाठी दि. बा. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य राखीव जागा समर्थन समिती स्थापन करून महाराष्ट्रात ओबीसी समाजात जागृती केली. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्यांचे हे ऋण कधीही विसरणार नाही.
दि. बा. पाटील यांचे कार्य महाराष्ट्रव्यापी होते. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त तसेच ओबीसी जनतेचे ते खर्या अर्थी लोकनेते होते.
- दीपक रा. म्हात्रे , ज्येष्ठ पत्रकार