शिवसेना नगरसेविका, कार्यकर्त्यांसह प्रसारमाध्यमांना पोलिसांनी रोखले
खोपोली : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 28) खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमास भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगत या वेळी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ‘रमाधाम’च्या प्रवेशद्वारावर रोखल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनाही मज्जाव केला.
रमाधाम वृद्धाश्रमातील नूतन वास्तूचे काम सुरू आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. सोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुमन औसरमल, तालुकाप्रमुख संतोष विचारे, शहरप्रमुख सुनील पाटील, उपनगराध्यक्ष वनिता कांबळे, मुख्याधिकारी गणेश शेटे, काही नगरसेविका यांच्यासह शासकीय व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुमारे दीड तास मुख्यमंत्री रमाधाममध्ये होते. त्यानंतर त्यांनी मुंबईला प्रयाण केले. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून जाणार होते त्या रस्त्याच्या प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. रमाधामकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडविला होता. त्यामुळे कडक बंदोबस्ताचा आजोशी ग्रामस्थांनाही फटका बसला. मुख्यमंत्री येण्याच्या व जाण्याच्या वेळेला रस्ता सील केल्यामुळे काही काळ खोपोली-पेण रस्ता व मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
शेतकर्याची भेटही टाळली
मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातबारा कोरा करू, मला शेतकर्यांचे अश्रू पुसायचे आहेत, शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मदत करा, असे म्हटले होते, मात्र शनिवारी रमाधाम आश्रमात जालना जिल्ह्यातून आलेल्या जनार्दन वाघ या शेतकर्याला सुरक्षेच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. वाघ हे सकाळपासून तेथे आले असूनही त्यांची भेट टाळण्यात आली. त्यांची 30 एकर जमीन तलावाच्या कामासाठी शासनाने संपादित केली होती, मात्र त्याच्या मोबदल्यासाठी वारंवार कार्यालयात फेर्या माराव्या लागत आहेत, अशी व्यथा त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मांडली.