Breaking News

आपापसातील भांडणे किती दिवस लपवणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला सवाल

पुणे : प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावरून प्रशासकीय अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात असा सवाल केला आहे. पुण्यात एसएनडीटी येथील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यातील कोविड परिस्थिती आणि मंत्रिमंडळातील नाराजीनाट्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरू आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत. शेवटी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. आणि आगामी काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वारकर्‍याला वापरलेले अपशब्दावरुन त्यांच्यावर सर्व समाजातूनच टीकेची झोड उठविली जात आहे. या प्रकरणावर भाष्य करताना पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हम करे सो कायदा, अरेरावी, भ्रष्टाचार हा स्थायीभाव आहे. आता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. एका शिवसेनेच्या आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येऊन येणार्‍या नागरिकांनाच लस मिळेल अशाप्रकारचा फतवा काढला आहे. यावर काँग्रेसच्या आमदारानेच प्रत्युत्तर केले आहे. असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून  एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल, अशा शब्दांत पाटील यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना उपरोधिकपणे टोला लगावला. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले होते. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply