Breaking News

कोकणातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची उच्चस्तरीय समिती

अलिबाग : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात त्याची तीव्रता अधिक आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा एका बैठकीचे आयोजन केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीच्या अनुषंगाने ताबडतोब केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे एक निर्णय घेण्यात आला व कोकणातील नारळ शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली.

नियुक्त केलेल्या या समितीमध्ये कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन, केरळमधील कासारगौड येथील संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे प्रतिनिधी, महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे संचालक आणि मुख्य नारळविकास अधिकारी यांचा समावेश आहे. समितीने 30 जूनपर्यंत केंद्रीय कृषी मंत्रालयाला अहवाल सादर करायचा आहे.

दरम्यान, ही समिती नेमल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आभार मानले आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना व गावकर्‍यांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पक्षातर्फे मदतीचे साहित्य यापूर्वीच रवाना करण्यात आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोकणचा दोन दिवसांचा दौरा केला आहे. यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच पक्षाच्या आमदारांनी आणि पदाधिकार्‍यांनी कोकणातील विविध गावांना भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे. पक्षाचे स्थानिक कार्यकर्तेही मदतकार्यात गुंतले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply