ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन केंद्र सुरू
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 18 मेपासून ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावरती मंगळवार (दि. 18) पासून सायंकाळी 4 ते 5 या वेळेत 45 वर्षांवरील सर्व दिव्यांग बांधवाच्या कोविड लसीकरणास सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ओवे गाव, खारघर येथील आरोग्य उपकेंद्र, मनुस्मृती रोटरी क्लब आणि कळंबोली येथील प्रभाग समिती ‘ब’ कार्यालयाच्या बाजूला आरोग्य उपकेंद्र काळभैरव मंगल कार्यालय येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यातील काळभैरव मंगल कार्यालय येथील लसीकरण केंद्रावरती ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येत आहे.