Breaking News

नवी मुंबईम हापुसची आवक घटल्याने निर्यात रोडावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत जानेवारी फेब्रुवारीपासून कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. तसेच मुख्य हंगाम एप्रिल- मेमध्ये सुरू होतो, मात्र यंदा उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे एप्रिल-मे महिन्यात दाखल होणार्‍या हापूसला अवकाळीचा फटका बसल्याने एपीएमसीत आवक घटली आहे. त्यामुळे मुबलक हापूस उपलब्ध नसल्याने हापुसची निर्यात देखील रोडावली आहे.
मागील वर्षी एप्रिल मध्ये 70 टक्के ते 75 टक्के निर्यात होती, यंदा मात्र अवघी 10 टक्के निर्यात झाली आहे, अशी माहिती निर्यातदार यांनी दिली आहे. यंदा हापुसचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरेसा हापुस दाखल होत नसल्याने त्याचा आखाती देशातील निर्यातीवर परिणाम होत आहे. मुबलक हापुस उपलब्ध होत नसल्याने यंदा ऐन हंगामात केवळ 10% निर्यात होत आहे. आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत याठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्याना अधिक प्रमाणात मागणी असते. 15 फेब्रुवारी नंतर टप्प्याटप्प्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथील हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते, परंतु यंदा फेब्रुवारी अखेर अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबा बागयदार यांनी हापूसची तोडणी करून विक्रीसाठी बाजारात पाठवला. त्यामुळे यंदा फेब्रुवारी-मार्च मध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणाहुन हापूस मोठया प्रमाणात बाजारात दाखल झाला होता, शिवाय दर ही उतरले होते. मार्चच्या सुरुवातीपासून ते दोन आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने कोकणाला 2-3वेळा झोडपून काढले. त्यामुळे ऐन हापूसच्या हंगामात आंब्याच्या झाडावर अवेळी पालवी फुटली,पालवी फुटल्याने आंब्याचे शोषण झाले असून पुरेसे पोषण न मिळाल्याने आंबे गळ झाली. हेच आंबे एप्रिलमध्ये विक्रीसाठी दाखल होणार होते. अवकाळीने हाताशी आलेले उत्पादन वाया गेले. एप्रिल ते मे अखेर पर्यंत निर्यातीवर जोर असतो. मात्र हापूसच्या मुख्य हंगामातच मुबलक हापूस उपलब्ध नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत आता निर्यात ही 60 टक्के कमी झाली आहे.

मार्चमध्ये हापूस निर्यातीचा जोर वाढला होता. परंतु आता अवकाळी पावसाने हापूसचे उत्पादन घटले आहे,त्यामुळे मुबलक हापूस उपलब्ध नसून निर्यात कमी होत आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये 75 टक्क्यांपर्यंत निर्यात होती परंतु आता अवघे 10 टक्के निर्यात होत आहे. त्यामुळे त्याचा दरावरही परिणाम झाला असून दरवाढ झाली आहे.
-मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार, एपीएमसी

मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने आंब्याच्या झाडावर अवेळी पालवी फुटली परिणामी आंबा गळ झाली. एप्रिलमध्ये दाखल होणार्‍या हापूस आंब्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हापूस उत्पादन घटले आहे. परिणामी निर्यातीही कमी होत आहे. -चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply