उरण : प्रतिनिधी
जेएनपीटी बंदर परिसरात रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड कंटेनर ट्रेलरमुळे मोठ्या वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड वाहनांवर कायदेशीर ऑनलाइन दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बंदर परिसरातील रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभी असलेली वाहने हटविल्याने जेएनपीटी बंदर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
जेएनपीटी बंदरात आयात-निर्यातीसाठी मालवाहतूक करणार्या अवजड कंटेनर ट्रेलर चालकांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या नित्याची झाली आहे, मात्र वाहतूक पोलिसांनी कालपासून जेएनपीटी बंदरातील रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बंदराकडे जाणार्या वाहनांना मार्गक्रमण होण्यासाठी सोयीचे ठरत आहे. जेएनपीटीने सुरू केलेल्या पार्किंगचे दर सामान्य ट्रेलर वाहतूक चालकांना परवडणारे नसल्याने ते पर्यायी मार्ग आणि पैसे वाचविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वाहने पार्किंग करीत आहेत.
जेएनपीटी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अधिक प्रमाणात वाहने उभी केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. जेएनपीटी बंदरात जेएनपीटीसह जीटीआय, एनएसआयसीटी व भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स अशी चार बंदरे कार्यरत आहेत.