Breaking News

अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेचा पुढाकार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अधोरेखित केलल्या 36 अपघात प्रवण क्षेत्रांत आता पालिका प्रशासनाने झेब्रा क्रॉसिंगसह इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरातील अपघात प्रवण क्षेत्रांत सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इंन्टीग्रेटेड मल्डीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डीआयएमटीएस) यांच्या अहवालानुसार नगरविकास विभागाने पालिका प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा समिती’ची बैठक घेण्यात आली.

यात वाहतूक पोलिसांनी नवी मुंबईतील 36 अपघात प्रवण क्षेत्रे असल्याचा अहवाल पालिकेला दिलेला असून त्या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली. कालबद्ध कार्यक्रम हाती घेत आवश्यक उपाययोजना तत्परतेने करण्याचे या वेळी आयुक्तांनी दिले.

बैठकीस शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते. तर आयआयटी मुंबईचे प्राध्यापक तथा समिती सदस्य के .व्ही. कृष्णराव, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राध्यापक मंजुळा देवी यांनी दूरचित्रसंवाद माध्यमातून सहभाग घेतला. या वेळी पालिका नागरी रस्ता सुरक्षा सुधारणा आराखडयाचे सादरीकरण मे. टंडन अर्बन सोल्युशनचे प्रतिनिधी रवींद्र एस. यांनी केले.

सुरक्षाविषयक उपाययोजना

अपघातप्रवण क्षेत्रात पालिकेच्या वतीने झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर अशा तत्पुरत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. अरेंजा कॉर्नर ते कोपरीगाव, मोराज ते एनआरआय, अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन, शीव-पनवेल महामार्गावर सानपाडा जंक्शन या ठिकाणी प्राधान्याने सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply