विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली आहे.
तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवार (दि. 19)पासून तीन दिवसांच्या कोकण दौर्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौर्याची सुरुवात अलिबाग येथून केली. अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत त्यांच्याशी फडणवीस यांनी वादळात झालेल्या नुकसानीबाबत
चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अॅड. महेश मोहिते, सतीश धारप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, रायगडमध्ये जे नुकसान झालेय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास आठ ते 10 हजार घरांचे नुकसान झाले. विशेषत: पाच हजार हेक्टरमध्ये फळपिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, तसेच फळपिकांचे नुकसान झालेय. जवळपास 200 शाळांचे नुकसान झाले आहे. 25 वैद्यकीय सेवा पुरवणार्या इमारतींचे, वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही 172 गावांमध्ये 70 हजार घरे अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. चार मृत्यू या वादळामुळे जिल्ह्यात झाले आहेत.
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. अनेकांना जी मदत अपेक्षित होती ती मिळालेली नाही. यातून सावरत असताना आता हा दुसरा झटका आहे. एकीकडे लॉकडाऊन, करोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. वर्षभरातच दुसरा झटका लोकांना बसला आहे. नुकसान काही मोजक्याच जिल्ह्यांमध्ये झाले आहे. काही ठिकाणी किरकोळ नुकसान आहे. मदत देण्यासाठी राज्य सरकारवर मोठा बोजा पडणार नाही. त्यामुळेे सरकारने वादळग्रस्तांना भरघोस मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
या वादळामध्ये बोटी फुटून कोळी बांधवांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई कोळीबांंधवांना अद्याप मिळालेली नाही. या वेळच्या वादळामुळे झालेल्या नुकसानीने कोळी बांधव उद्ध्वस्त होतील. त्यामुळे कोळी बांधवांना मोठी आर्थिक मदत राज्य सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनीव्यक्त केली.