Breaking News

शेतकर्यांच्या उभारणीसाठी खरिपाची तयारी

शेतकर्‍यांनी स्वतःकडे असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेऊन बियाणे निवडावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी केले आहे. त्याच वेळी शासनाच्या बीज प्रक्रिया कार्यक्रमात भाग घेऊन अन्य शेतकर्‍यांसाठी चांगले बीजोत्पादन उपलब्ध करून देण्याचा सल्ला कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी प्रसिद्धपत्रक काढून शेतकर्‍यांना दिला आहे.

सन 2021-22मध्ये कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्व बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शेतकरी जर स्वतःकडील बियाणे पेरणीसाठी वापरत असतील, तर त्यांनी बियाणांची उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करून बियाणे वापरल्यास ती प्रभावी व अखर्चिक असून जमिनीतून व बियाणातून होणारा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. त्यामुळे त्यातून पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढल्याचा शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. या दृष्टीने खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त घरगुती बियाणांवर बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी शेतकर्‍यांना दिला. तसेच भात पिकामध्ये शेतकर्‍यांकडील स्वतःचे बियाणे वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याने तीन वर्षांवरील घरगुती बियाणांची उत्पादन क्षमता कमी होत असल्याने ती वापरू नये. बियाणांत बदल करावा अथवा विद्यापीठाकडील बियाणे वापरावीत, असा सल्लादेखील या वेळी शेवाळे यांनी दिला.

घरगुती बियाणांची क्षमता चाचणी

प्रथम बियाणे पाण्यामध्ये टाकून वर तरंगणारे पोचट व रोगट बियाणे वेगळे करून वर्तमानपत्र अथवा गोणपाट ओले करून त्यावर एका ओळीत दहा अशा शंभर बियाणांची मांडणी करावी. त्यानंतर त्यांची गुंडाळी करून दोन्ही बाजूला दोरीने घट्ट बांधून सावलीत वाळवावी. ही गुंडाळी पाच दिवस सतत ओली राहील याची दक्षता घ्यावी. सहाव्या दिवशी मोड आलेल्या किंवा उगवलेल्या आणि न उगवलेल्या बियाणांची संख्या मोजावी. 75 ते 80 टक्क्यांच्या पुढे उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीयोग्य समजावे. भात बियाणांवर जमिनीतून व बियाणेद्वारे होणारा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक संरक्षणावरील खर्चामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होते. पर्यायाने उत्पादन घटते. त्याकरिता बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते.

मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया

यामध्ये 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ विरघळून भात बियाणे टाकावे व चांगले ढवळून घ्यावे. नंतर पोकळ व तरंगणारे रोगट बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे, तर तळाशी राहिलेले निरोगी बियाणे बाहेर काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळविणे. त्यानंतर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याने पिकास 34 अपायकारक असणार्‍या बुरशींचा नायनाट होतो. यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बेन्डाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम या प्रमाणात बियाणास प्रतिकिलो पेरणीपूर्वी चोळावे.

जीवाणू खताची बीज प्रक्रिया

पिकाच्या वाढीसाठी आवश्यक नत्र व स्फुरद सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी पीएसबी (स्फुरद विरघळणारे जीवाणू) 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि अझोटोबॅक्टर (नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू) 200 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे खरीप हंगामात सर्व शेतकर्‍यांनी भात बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया अवश्य करावी.

10 हजार हेक्टर जमिनीवर शेती

खरीप हंगामात कर्जत तालुक्यात तब्बल 10 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची शेती केली जाते. खरीप हंगामात 1980च्या दशकात 28 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची शेती होत होती आणि त्यामुळे कर्जत तालुक्याला भाताचे कोठार समजले जात होते. आता जमिनी विकून त्या जागेवर फार्म हाऊसेस उभी राहिली असून काही भागात स्थानिक शेतकर्‍यांनी कृषी पर्यटन केंद्र तसेच लहान रिसॉर्ट उभे केले आहेत. त्यातून व्यवसाय सुरू करून शेतीतून पर्यटनाकडे जाण्याचा आणि त्यातून आर्थिक सक्षम होण्याचा प्रयत्न केला आहे, पण कर्जत तालुक्यातील सध्या होत असलेली खरीप हंगामातील भाताची शेती ही प्रगतशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून करीत असल्याने आणि अनेक नवनवीन जातीचे वाण वापरून पीक घेतले जात असल्याने भाताचे उत्पादन वाढले आहे.

आदिवासींची शेती

कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना ही दुर्गम भाग, सपाट प्रदेश अशी आहे. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी हे डोंगर उतारावर, माळरानावर नाचणी, वरी यांची शेती करतात. 100हून अधिक आदिवासी वाड्यांमधील आदिवासी शेतकरी साधारण 50 हेक्टर जमिनीवर अशी शेती करून आपले पारंपरिक व्यवसाय जतन करून आहेत.

शेताच्या बांधावर खत

कृषी विभागाने गेल्या काही वर्षांपासून शेताच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी संशोधन गटामार्फत नोंदणी करायची असते. या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होत असून बाजारातून चढ्या भावाने खते घेण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे बळीराजा कृषी विभागाच्या या योजनेबद्दल समाधानी आहे.

रग्बी हंगामातही शेती

कर्जत तालुक्यात असलेला राजनाला कालवा तसेच दोन लघु पाटबंधारे प्रकल्प आणि पाच पाझर तलाव यातील पाण्याचा वापर करून उन्हाळ्यातदेखील शेती केली जात आहे. त्यात भाताच्या शेतीतून बीजोत्पादनासाठी बियाणे निर्मितीचे मोठे योगदान कर्जतचा शेतकरी देत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply