- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
- तोंडरे, पडघे येथे विविध कामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांसाठी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत सुमारे 123 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 29 गावांमध्ये जलवाहिन्या टाकणे तसेच पाण्याच्या टाक्या उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 2मधील तोंडरे गावात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पडघे येथे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि.4) झाले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकाप पदाधिकार्यांच्या माध्यमातून या विकासकामांचे श्रेय घेण्याच्या वृत्तीचा समाचार घेत शेकापचे या विकासकामांमध्ये एका रुपयाचेही योगदान नाही, असे सांगून भाजप नियोजनबद्ध पद्धतीने सर्व गावांचा विकास डोळ्यांसमोर ठेवून काम करीत आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचे काम करण्यासाठी भाजप महापालिकेला सातत्याने प्रवृत्त करीत राहील, अशी ग्वाही दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियान अंतर्गत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. याद्वारे पनवेल महपालिका क्षेत्रातील 29 गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था पुरवणे, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मलनिस्सारण वाहिन्या उभारण्याचे काम 123 कोटी 14 लाख 31 हजार 669 रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे.
यातील प्रभाग क्रमांक 2मधील नावडे, पडघे, तोंडरे, देवीचापाडा, ढोंगर्याचापाडा, पाले खुर्द, नागझरी या गावांमधील कामांचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, सुरेश खानावकर, वासुदेव पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी सरपंच राम पाटील, अशोक पाटील, श्रीनाथ पाटील, रूपेश पाटील, अॅड.पवन भोईर, राजेश पाटील, अशोक साळुंखे, महेंद्र म्हात्रे, सतिश पाटील, महेंद्र म्हात्रे, गजानन पाटील, दिलीप भोईर, शंकूनाथ पडघेकर, पांडूशेठ भोईर, किरण दरे, नाथा माऊली, नामदेव भोईर, गुरूनाथ भोईर, पवन भोईर, माजी पंचायत समिती सदस्य कुंदा पाटील, अनिता म्हात्रे, सुवर्णा पाटील, सुश्मिता पाटील, विजय कांबळे, विद्यानंद पाटील, महेश भोईर, भरत म्हात्रे, विजय पाटील, किसन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.