Breaking News

निर्दयी पोलिसांकडून शेवे ग्रामस्थांवर अत्याचार

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
शेवे गावातील शूर महिलांनी पोलिसांच्या गोळीबाराला न जुमानता सिडको अधिकार्‍यांना जमीन संपादन करण्यास कडवा विरोध केला. त्यामुळे त्या अधिकार्‍यांना माघारी परत जावे लागले.
या घटनेने गावात थोडी दहशत निर्माण झाली, पण गावकरी सावध होते. गोळीबारात ज्या दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यांना मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना मदत करण्यासाठी काही गावकरी तेथेही ठाण मांडून बसले होते. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते.
इकडे पोलीस आणि सिडको अधिकारी सुडाने पेटले होते. जुलूम, जबरदस्ती करून जमिनीचा ताबा घेण्यासाठी आसूसलेले होते. त्यामुळे 14 आणि 15 तारखेला पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन ते गावात आले.गावकर्‍यांनी अगोदरच गावाच्या वेशीवर मोठा दगड ठेवून कोणतेही वाहन गावात शिरणार नाही याची व्यवस्था केली होती. त्यामुळे पोलिसांची वाहने गावात येऊ न शकल्याने गावाबाहेरच त्यांना थांबवावी लागली. ही वाहने थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 19 होती. त्यात 15 पोलिसांची व चार एसटी बसगाड्यांचा समावेश होता. ही सर्व वाहने गावाबाहेर उभी करून पोलिसांनी गावचे सरपंच, ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष अशा प्रमुख मंडळींना बोलावून त्यांना दमबाजी करायला सुरुवात केली.
गावात दहशत पसरवण्यासाठी एका निरपराध गावकर्‍याला बेदम मारहाण केली आणि गावात घुसून मिळेल त्या व्यक्तीला पोलीस झोडपू लागले. घरात घुसून बायका, मुलांनाही मारले. नुसती मारहाण करून ते थांबले नाहीत तर प्रत्येकाला फरफटत नेऊन पोलीस गाडीत टाकून लावले. त्यामुळे जो तो मिळेल त्या वाटेने रानावनात पळाला.
काही जण गावालगत असलेल्या समुद्राच्या दिशेने गेले तर काहींनी आपला जीव वाचवण्यासाठी होडीत बसून न्हावा, घारापुरी वा मुंबई गाठली. गावात पोलिसांनी धुडगूस घातला होता. त्यांनी सुमारे 150 गावकर्‍यांना बेदम मारहाण करून पकडले आणि ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये डांबून ठेवले. कोणताही गुन्हा केला नसताना केवळ पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे तेे तुरुंगात होते.
पोलिसांनी शेवे गावाची पूर्णतः नाकेबंदी केली होती. गावचा संपर्क तोडला होता. जी काही थोडी माणसं गावात आपला जीव मुठीत घरून दहशतीच्या छायेखाली राहात होती त्यांची अवस्था फार वाईट झाली होती. त्यांना कुठेही बाहेर पडता येत नव्हतं. रोजीरोटीही मिळत नव्हती. त्यांची उपासमार होत होती, पण निर्दयी पोलिसांना त्यांची जराही फिकीर नव्हती. वसंतदादांच्या जुलमी सरकारचे ते गुलाम बनले होते.
शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी या आंदोलनाचे प्रणेते दि. बा. पाटील जेव्हा या गावात आले तेव्हा पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली.
‘दिबां’ना अटक केल्यावर शेतकर्‍यांचे हे आंदोलन थांबेल, असा पोलिसांचा समज होता, पण शेतकरी, शेतमजूर, गावकरी एकजुटीने पेटून उठले होते. ही लढाई आता अंतिम स्वरूपाचीच करायची हा निर्धार त्यांचा होता.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply