मुरूड ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत केलेला मालमत्ता घोटाळा लवकरच जनतेसमोर आणू, असे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. ते सोमवारी (दि. 7) मुरूड तहसील कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष बाळा भगत, युवा मोर्चा अध्यक्ष अभिजीत पानवलकर, कृष्णा किंजले, बोर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश कट, मुरूड शहर अध्यक्ष उमेश माळी आदी होते.
सोमय्या यांनी सांगितले की, 21 मार्च 2014 रोजी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर कुटुंबीयांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांची कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत असलेली जमीन घेण्याचा निर्णय घेतला आणि 29 एप्रिल 2014 रोजी जमिनीबाबतचे रजिस्ट्रेशन पूर्ण केले, पण 29 एप्रिल 2014 ते 11 नोव्हेंबर 2020पर्यंत या जमीनीचा कोणताही कर त्यांनी भरलेला नव्हता तसेच सहा वर्षांपासून ही 9.35 एकर जमीन अन्वय नाईक यांच्याच नावावर होती. याचा पर्दाफाश केल्यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर 2020 रोजी ठाकरे आणि वायकर यांनी मालमत्ता कर, वीज कर आणि पाणीपट्टी भरल्याचा दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मागील सहा वर्षे अन्वय नाईक यांची मालमत्ता आपल्याकडे ठेवणे हा एक प्रकारचा बेनामी मालमत्तेचा आणि मनी लॉण्डरिंगचा व्यवहार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमीन व्यवहार, बंगले अशी बेनामी मालमत्ता त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवून जनतेची फसवणूक केली आहे. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मी केलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच ठाकरे यांची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होईल, असेही सोमय्या म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी ठाकरेंना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप करून कोरोना परिस्थितीमुळे आम्ही तीन महिने पाठपुरावा थांबवला होता, पण आता हा घोटाळा एक महिन्याच्या आत जनतेसमोर आणणार आहे. याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीकडून योग्य माहिती आणि सहकार्य मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेणार आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
याबाबत तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले की, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मागितलेली माहिती त्यांना देण्यात आली असून उर्वरित माहिती लवकरच त्यांना देण्यात येईल. कोर्लई ग्रामपंचायतीचा विषय हा आमच्या विभागाचा नाही. तो विषय जिल्हा परिषद अखत्यारीत आहे.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper