Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी आरपारचा लढा!

शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी जबरदस्त लढा उभा राहिला आहे. ‘दिबां’नी ज्या सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले तेच भूमिपुत्र आता ‘दिबां’च्या नावाची अस्मिता जपण्यासाठी एकवटलेत. हीच या लोकनेत्याच्या कार्याची पोचपावती आहे.

आज पनवेल, नवी मुंबईचे स्थान केवळ देशाच्याच नव्हे तर जागतिक नकाशावर झळकत आहे. विविध प्रकल्प, उद्योगांमुळे या परिसराला आलेली सुबत्ता डोळ्यांत भरणारी आहे, पण एकेकाळी हा परिसर विकासापासून कोसो दूर होता. जिथे स्थानिकांना जगण्यासाठी अन्न, वस्त्राची भ्रांत होती तिथे त्यांचे भविष्य काय असणार?, परंतु अशा अंधःकारमय परिस्थितीत याच भूमितून एक आशेचा किरण समोर आला आणि त्याच्या तेजःपुंज कार्याने जनसामान्यांच्या जीवनात नवी पहाट झाली. या व्यक्तीचे नाव होते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील.

सिडको, जेएनपीटी ते आताच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात वाजवी भाव आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी दि. बा. पाटील यांनी वेळोवेळी केलेली आंदोलने सर्वश्रुत आहेत, पण त्यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर त्याला विविध पैलू आहेत. बहुतांश उच्चशिक्षित मंडळी नोकरी-व्यवसायात रमतात, मात्र कायद्याची पदवी घेतलेले ‘दिबा’ याला अपवाद होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला. जिथे अन्याय तिथे ’दिबा’ असे जणू समीकरणच बनले होते.

एकीकडे दि. बा. पाटील सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून लढा देत होते तर दुसरीकडे जिथे महत्त्वाचे निर्णय होतात, कायदे बनतात त्या विधिमंडळ व संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या अभ्यासू शैलीने सरकारला दिशा देत असत. प्रसंगी सरकारला धारेवरही धरत. चांगल्या गोष्टीचे समर्थन आणि वाईटावर प्रहार असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे भले भले नेते त्यांना टरकून असत. गर्भलिंग निदान, अंधश्रद्धा अशा अनेक चुकीच्या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. आज अनेक चांगले कायदे त्यांच्यामुळेच अस्तित्वात येऊन त्याचा फायदा सर्वांना होत आहे.

असे होते ‘दिबा’…  शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे ‘बा’ म्हणजेच वडील, पालक. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. अखेरच्या काळात अगदी रुग्णवाहिकेतून येऊन ते आंदोलकांना मार्गदर्शन करीत असत. अशा महान नेत्याचे नाव त्यांच्याच कर्मभूमीत होत असलेल्या विमानतळ प्रकल्पाला देण्याची मागणी रास्त आहे. म्हणूनच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटना आणि आम जनता असे सर्व जण यासाठी आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या मानवी साखळी आंदोलनातून आली. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील हजारो लोक या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही आरपारच्या लढ्याची नांदी आहे.

दि. बा. पाटील यांच्या नावाप्रती असलेल्या जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने विमानतळ नामकरणाबाबत पुनर्विचार करणे आवश्यक आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे वंदनीय आहेत. त्यांच्या कार्याविषयी कुणालाही शंका नसेल, पण त्यांचे नाव याआधी अनेक ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि यापुढेही अन्य प्रकल्पांना देता येऊ शकते, परंतु नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे हा एकमेव उचित पर्याय आहे. विशेष म्हणजे त्यासाठी स्थानिक लोक तडजोड करायला अजिबात तयार नाहीत. म्हणूनच सरकारने आपला हट्ट सोडून विमानतळाला ‘दिबां’चे नाव देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा; अन्यथा ‘दिबां’च्याच शिकवणीनुसार संघर्ष अटळ आहे.

भूमिपुत्रांचा निर्धार पक्का!

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांच्या भावना तीव्र आहेत. काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही, असा निर्धार सर्वांनी केला आहे. खरेतर या लढ्याला आता कुठे सुरुवात झाली आहे. यात सातत्य आवश्यक असून त्यासाठी तरुणाईने पुढाकार घेऊन विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याकरिता सुरू झालेली ही लोकचळवळ अशीच पुढे चालू ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे भूमिपुत्रांची एकजूट पाहून ‘दिबा’विरोधी मंडळी आंदोलकांची दिशाभूल करण्याचा, आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यापासून सावध राहायला हवे. मग मात्र कुणी किती वल्गना केल्या तरी जनतेच्या मनातील लोकनेत्याला ते त्यांच्यापासून वेगळे करू शकणार नाहीत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply