Tuesday , February 7 2023

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली, गौरवशाली आंदोलनात पहिल्या दिवशी दोन जण हुतात्मा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
16 जानेवारीच्या आंदोलनाचे निरोप तातडीने 15 तारखेला रातोरात सर्वत्र गेले होते. निरोप मिळताच काही गावकर्‍यांनी त्याच रात्री आंदोलनाची तयारी सुरू केली. पनवेल-उरण महामार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तो इतका कडक होता की रस्त्यालगतच्या झाडांवरही बंदुकधारी पोलीस बसवले होते. कारण त्यांना धास्ती होती की चिडलेले शेतकरी, शेतमजूर कुठूनही आपल्याला भिडतील.
या आंदोलनासाठी खारीगाव, कळवा, बेलापूर, नवी मुंबईतूनही शेकडो शेतकरी मोर्चाने जासईकडे निघाले, पण त्यांना कोपरखैरणे गावच्या नाक्यावर पोलिसांनी अडवले. त्या वेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये  थोडी बाचाबाची सुरू झाली, मात्र पोलिसांनी कसलाही विचार न करता त्यांच्यावर बेसुमार लाठीमार केला. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. कोपरखैरणे गावचे माजी सरपंच शंकर म्हात्रे यांचा तर पाय मोडला. अनेकांची डोकी फुटली. पोलिसांनी प्रचंड लाठीमार करून या मोर्चेकर्‍यांना पांगून लावले, पण अशा कठीण परिस्थितीतही शेतकरी पेटून उठला होता.
दास्तान फाट्याजवळ पोलिसांना अडथळा निर्माण व्हावा म्हणून गावकर्‍यांनी एक नवी युक्ती योजली. त्यांनी खलाटीतील, रानावनातील गुरंढोरं, गाई, म्हशी आणून तेथे रस्त्यावर सोडली. त्यांना रस्त्यातच भरपूर पेंढा खायला घालून ठेवला. त्यामुळे या गुराढोरांना रस्त्यातून हटवणं पोलिसांना त्रासाचं झालं.
इकडे गव्हाण बेलपाडामार्गे गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलघर, न्हावाखाडी, बामणडोंगरी आदी गावांतील जवळपास हजार गावकरी रामशेठ ठाकूर, जे. एम. म्हात्रे यांच्यासह दास्तान फाट्याकडे निघाले. वाटेत बेलपाडा गावाजवळ जमलेल्या गावकर्‍यांना त्यांनी सोबत घेतले. दास्तान फाट्याजवळ हळूहळू लोक जमा होऊ लागले होते. काही वेळातच आपल्या बाया-बापड्या, पोराबाळांसह शेतकर्‍यांचा प्रचंड जनसमुदाय तेथे गोळा झाला. पोलिसांनी मेसेज पाठवून एसआरपीची जादा कुमक मागवली.
आंदोलक शिस्तीने आंदोलन करीत होते. दि. बा. पाटील झिंदाबाद, एकरी 40 हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे, सिडकोच्या आमिषाला भुलू नका, काळ्या आईला विकू नका, अशा घोषणा द्यायला त्यांनी सुरुवात केली.
या घोषणा देतच ते पोलिसांना सामोरे जात होते, पण निर्दयी पोलीसांनी या निष्पाप शेतकर्‍यांवर लाठीमार आणि त्यानंतर गोळीबार सुरू केला. त्यामुळे सर्वत्र एकच हाहाकार उडाला. गोंधळ माजला तरीही या सर्वांनी निधड्या छातीने जमीन बचावाचा आक्रोश सुरूच ठेवला.
पोलिसांनी सुरू केलेल्या या अत्याचारांमुळे आंदोलक अधिक चिडले. काही तरुण आंदोलकांनी डीएसपी सावंत यांना बेदम मारहाण केली. अश्रुधूरांच्या नळकांड्या क्षणाक्षणाला फुटत होत्या. त्यामुळे सारा आसमंत धुराने व्यापून गेला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे अनेक निष्पाप जीव गंभीर जखमी झाले होते.
त्या दिवशी निशस्त्र आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात नामदेव घरत आणि रघुनाथ ठाकूर हे हुतात्मा झाले. या गोळीबारात जखमी होऊन खाली पडलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः ओढत, फरफटत नेत गाडीत ढकलले. त्यांना उपचारासाठी पुण्याला नेले. नामदेव शंकर घरत आणि रघुनाथ अर्जून ठाकूर यांच्या अंगातून इतकं रक्त वाहात होतं की पुण्यात नेता नेता वाटेतच त्यांनी प्राण सोडले. आपल्या काळ्या आईसाठी, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते हुतात्मा झाले, पण या निर्दयी सरकारला त्याची पर्वा नव्हती.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply