Breaking News

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्‍या दिवशी तिघांना हौतात्म्य

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार करीत पोलिसांचा नंगानाच सुरू होता. पोलिसांच्या डोळ्यांत हिंसेचा कैफ चढला होता. त्यांच्यातील माणुसकी गळून पडली होती. आंदोलकांना ते बेधुंदपणे झोडपत होते. जायबंदी झालेल्या आंदोलकांना कुत्र्यासारखे फरफटत नेत होते. लहान मुले, वृद्ध माणसांचा या रणधुमाळीत जीवाच्या आकांताने आक्रोश सुरू होता.
अशा वेळी जीवाची पर्वा न करता जखमींना आमच्या ताब्यात द्या, अशी पोलिसांना विनवणी करीत भारती पोवार पुढे आल्या. गोळीबाराच्या फैरी सुरू होत्या. त्यात आपलाही कधी जीव जाईल हे सांगता येत नव्हते, पण या धाडसी, जिगरबाज महिलेला रक्तबंबाळ झालेल्या जखमींची ती अवस्था पाहवत नव्हती. म्हणून त्या धाडसाने पुढे आल्या. पोलिसांना विनवू लागल्या, पण हिंसेचा कैफ चढलेले निर्दयी पोलीस त्यांनाच दमदाटी करू लागले. भारतीताईंनी त्यांना पुन्हा पुन्हा विनंती केली. शेवटी जखमींची संख्या वाढू लागल्याने गंभीर जखमींना त्यांनी पुण्यात नेले.
दास्तान फाट्याजवळ पोलिसांचा व आंदोलकांचा हा घनघोर रणसंग्राम सुरू असतानाच नवघर, पागोटे, भेंडखळ, कुंडेगाव येथील शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने नवघर फाट्याजवळ शिस्तबद्ध रीतीने निदर्शने करीत होत्या. पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर होती. दुपारच्या भर कडकडीत उन्हात बराच वेळ ही निदर्शने सुरू होती. त्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांनी सूचना दिली की, उद्याही अशाच प्रकारे निदर्शने करण्यात येणार असल्याने आता तुम्ही घरी जा. आंदोलक हळूहळू आपापल्या घरी गेले. तोपर्यंत त्यांना दास्तान फाट्याजवळ झालेल्या घनघोर संघर्षाची फारशी माहिती नव्हती.
दास्तान फाट्याजवळ आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराची व बेधुंद गोळीबाराची बातमी दुसर्‍या दिवशी मुंबईतील वर्तमानपत्रांत झळकली. विरोधी पक्षनेत्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करीत सरकारवर टीकेची तोफ डागली. काही नेतेमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. किंबहुना 17 तारखेला शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी भारती पोवार करळपाडा येथे आल्या होत्या. त्याच वेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार हेदेखील उरण येथे येणार असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे त्यांना भेटायला नवघर, पागोटे, भेंडखळ, कुंडेगाव येथील काही स्थानिक नेतेमंडळी नवघर रेल्वे फाटकाजवळ हजर होती.
पोलिसांच्या गाड्या सारख्या ये-जा करीत होत्या. अचानक दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास पोलिसांच्या पाच-सहा गाड्या नवघर फाट्याजवळ येऊन धडकल्या. नवघर फाटा ते रेल्वे फाटकापर्यंतचा रस्ता आंदोलकांनी खोदून ठेवला होता. त्यामुळे शस्त्रधारी पोलीस गाडीतून उतरले आणि रेल्वे फाटकापर्यंत चालत आले. आंदोलकांना वाटले की पवारसाहेब  येताहेत म्हणून हा बंदोबस्त असेल. त्यामुळे तेही नवघर रेल्वे फाटकाजवळ आले. क्षणार्धात शेकडो आंदोलकांचा जमाव तेथे जमला व त्यांनी दि. बा. पाटील आणि शरद पवार यांच्या नावाने झिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात एका पोलिसाने पागोटे गावातील एका आंदोलकाला बंदुकीच्या दस्त्याने बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी काही आंदोलक पुढे गेले. त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे आंदोलकांची धावाधाव सुरू झाली. नवघर रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी असल्याने आंदोलक रस्त्याच्या दिशेने पांगले. या संधीचा फायदा घेत पोलिसांनी गोळीबार करायला सुरुवात केली. सीआरपीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात नवघर तळ्याजवळ आंदोलनासाठी उभे असलेले महादेव हिरा पाटील जबर जखमी होऊन खाली कोसळले. एक गोळी त्यांच्या छातीत घुसून आरपार बाहेर पडली. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या राम बंडा नावाच्या आंदोलकाच्या दंडामधून दुसरी गोळी गेली. मग आंदोलक चिडले. ते पोलिसांना प्रतिकार करू लागले. पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. त्यात केशव महादेव पाटील आणि कमलाकर कृष्णा तांडेल हे जखमी होऊन रेल्वे रुळावरच कोसळले. लोक त्यांना उचलण्यासाठी पुढे गेले, पण पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना माघारी पिटाळले. नवघर रेल्वे फाटकाजवळ पोलीस आणि आंदोलक एकमेकांना भिडले होते. दगडफेक, गोळीबार सुरू होता. एवढ्यात एसआरपी जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले. आंदोलक थोडे पांगले. त्याचाच फायदा घेत पोलिसांनी जखमी अवस्थेत पडलेले महादेव हिरा पाटील, कमलाकर कृष्णा तांडेल, केशव महादेव पाटील यांना फरफटत बंदुकीच्या दस्त्याने मारझोड करीत नवघर फाट्यापर्यंत गुरासारखे ओढत नेले. खरंतर त्यांना वेळीच उपचार मिळाले असते, तर ते वाचले असते, पण निष्ठूर पोलिसांनी त्यांना बदडून ठार मारले.
आंदोलकांवर एवढे अत्याचार करूनही सरकारने चुकीच्या बातम्या पसरविल्या. नवघर रेल्वे फाटकाजवळ निदर्शकांनी बस व सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले. खरंतर तिथे जाळपोळ करण्याचा किंवा वाहतूक पूर्णपणे बंद असताना बस जाळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यामुळे अशा चुकीच्या बातम्या पसरवून वस्तुस्थिती बदलणार नव्हती की आंदोलनाची धारही कमी होणार नव्हती. शेतकरी चिडलेलेच होते.
  जखमी झालेल्या तिघांना मुंबईत जे. जे. हॉस्पिटलमध्ये आणले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशा प्रकारे त्या दिवशी महादेव हिरा पाटील, कमलाकर कृष्णा तांडेल, केशव महादेव पाटील हे तिघे जण हुतात्मा झाले आणि दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन सार्‍या महाराष्ट्रभर गाजले.

  • दीपक रा. म्हात्रे,
    (ज्येष्ठ पत्रकार)

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply