पनवेल : वार्ताहर
तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, रोहिंजण गाव व इतर परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे रोहिंजण परिसरात विविध ठिकाणी छापे मारले. या वेळी साई इच्छा बिल्डींगमध्ये तसेच पवन कदम व विनोद कदम यांच्या चाळीत अमिन इम्रान शेख (वय 23), ओहाब इसराफिल शेख (वय 55), नुर इस्लाम होरमुज (वय 35), रोजिना जैनल मुल्ला (वय 26), मिम्मा अमिन शेख (वय 20), परविन नुर इस्लाम शेख (वय 25), जैनल मुल्ला हमिद मुल्ला (वय 32), हे सात जण रहात असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली तसेच त्यांना भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले, मात्र ते कोणतेही ठोस पुरावे सादर करु शकले नाहीत. अधिक चौकशीत सगळ्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे स्वत: कबुल केले. तसेच त्यांनी बांगलादेशातील गरीबीला कंटाळुन रोजगार मिळवण्यासाठी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. या सात बांगलादेशी नागरिकांनी वैद्य प्रवाशी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन तळोजा परिसरात अवैधरित्या वास्त्यव्य करित असल्याचे आढळुन आल्याने या सगळ्यांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियमानुसार, तसेच परिकय नागरी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटक करण्यात आली आहे.