रिषभचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीने केली गोलंदाजी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूही समर्थ आहेत. लंडन दौर्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाने दोन गटांत विभागणी करून सरावाला सुरुवात केली. एका संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज, तर दुसर्या संघात सर्वोत्तम गोलंदाज असा हा सामना रंगला.
या वेळी बिनधास्त खेळीने ओळखल्या जाणार्या रिषभ पंतने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना 94 चेंडूंत 124 धावा कुटल्या. रोहित शर्मासोबत फायनलमध्ये सलामीसाठी शर्यतीत असलेल्या शुबमन गिलनेही फॉर्मात असल्याची प्रचिती दिली. त्यानेही 85 धावांची खेळी केली. या वेळी कर्णधार विराट कोहलीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराटने गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी किवी संघाला बुचकळ्यात टाकले आहे. विराट नक्की कोणती रणनीती आखतोय हेच किवींना ओळखणे अवघड झाले आहे.
18 ते 23 जून या कालावधीत रंगणार्या कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचे यासाठी विराट आतापासूनच विचार करीत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा ही नावे अंतिम 11मध्ये पक्की मानली जात आहेत, पण उर्वरित दोन जागांसाठी 11 उमेदवार आहेत आणि त्यातून छाननी करणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.
भारतीय संघ : विराट कोहली, अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धिमान सहा राखीव खेळाडू ः अभिमन्यू इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला.