Breaking News

कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?

निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला कारण आहे, अनेक दशकानंतर कर्जत तालुक्यात पडलेला कमी पाऊस. त्यापेक्षा धरणे आणि पाझर तलाव यांना लागलेली गळती. त्यामुळे तालुक्यातील तीन धरणे आणि चार पाझर तलाव यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी कर्जत तालुक्यात जेमतेम 2800 मिली पाऊस झाला होता. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता तालुक्यात किमान 3300 मिलीच्या पुढे पाऊस झाला आहे. एवढा पाऊस तालुक्यातील जलस्त्रोत पूर्ण भरून जाण्यास पुरक ठरतो. शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी बांधलेले पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प दरवर्षी जुलै महिन्यात ओसंडून वाहत असतात.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा (पाथरज), खांडपे, सोलणपाडा (जामरुंग), कशेळे, साळोख आणि खांडस या सहा ठिकाणी पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. तर पाटबंधारे विभागाने तीन लहान धरणे बांधली आहेत. सहा पैकी दोन पाझर तलाव दगड-मातीने भरल्याने ते मागील वर्षी भरून वाहिले होते, मात्र तर लहान धरणे ओव्हर फ्लो झाली नव्हती. खांडस आणि डोंगरपाडा येथील पाझर तलाव फुटून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर डोंगरपाडा येथील पाझर तलावाची नव्याने निर्मिती करण्यात आली. 2013 मध्ये सोलणपाडा पाझर तलावाला भेगा पडल्याने दोन गावांतील लोकांचे स्थलांतर करावे लागले होते. या पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तर खांडस पाझर तलावाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. कशेळे पाझर तलावातील गाळ गेली अनेक वर्षे काढण्यात आलेला नाही. या पाझर तलावाकडे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी कधी फिरकत नाहीत. गाळाने भरलेल्या खांडस आणि कशेळे या दोन्ही पाझर तलावाची निर्मिती शेतीला पाणी मिळावे म्हणून केली होती. मात्र मागील 10 वर्षात 1 टक्का जमीनदेखील ओलिताखाली येत नाही. हे जलस्त्रोत पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. अनेक वर्षे गाळ न काढल्याने साळोख तर्फे वरेडी या पाझर तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. खांडपे पाझर तलाव या वर्षी तरी पावसाळ्यात ओसंडून वाहू लागेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.
पाटबंधारे विभागाने कर्जत तालुक्यात तीन ठिकाणी लघुपाटबंधारे (लहान धरणे) उभारले आहेत. त्यांचा शेतीसाठी उपयोग होत नसल्याने ही धरणे बांधण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा कशासाठी केला? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील दहिवली कोदिवलेपासून मानिवली मोहिलीपर्यंचे शिवार उन्हाळ्यात ओलिताखाली आणण्यासाठी अवसरे वरई येथे 25 एकर जमिनीवर लघुपाटबंधारे प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र त्याची दुरुस्ती अनेक वर्षे झालेली नाही, त्यात गाळ साचला आहे. या धरणाची प्राधान्याने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पाषाणे येथील लघुपाटबंधारा  1990च्या दशकात फुटल्यानंतर ते धरण कर्जत तालुक्यात आहे याची माहिती तालुक्याला झाली.  रायगड जिल्ह्यातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या या धरणाचा फायदा ठाणे जिल्ह्यातील गावांना होत आहे. हे धरणदेखील 2020 च्या पावसाळ्यात ओव्हर फ्लो होऊन गेले नाही. कर्जत-नेरळ रेल्वे पट्टा 2000 सालापर्यंत पाणीटंचाई ग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता. त्यावर मात करण्यासाठी 1978 मध्ये पाली भूतीवली धरण मंजूर झाले होते. किरवलीपासून जिते गावापर्यंत असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे काम 1998 मध्ये खर्‍या अर्थाने सुरू झाले आणि धरणात 2004 मध्ये पाणीसाठा झाला. तेंव्हापासून या धरणातील पाणी आजही मृतावस्थेत पडून आहे. हे सर्व जलस्त्रोत सांभाळण्याची गरज असून शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

  • संतोष पेरणे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply