प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळली. सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
विरोधी पक्षनेते आणि कामगार संघटनांनी त्याच दिवशी तत्कालीन विरोधी पक्षनेते दत्ता मेघे यांच्या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार, प्रा. एन. डी. पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, दत्ता देशमुख, भाई बंदरकर, हशू अडवाणी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक, सुधीर जोशी, अहिल्याबाई रांगणेकर, कामगार नेते यशवंत चव्हाण, उत्तमराव पाटील, सोमनाथ दुबे, राम नाईक, पद्मसिंह पाटील असे विविध पक्षांचे, कामगार संघटनांचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत शेतकर्यांच्या विरोधात हटवादी भूमिका घेणार्या वसंतदादांच्या सरकारचा निषेध करण्यात आला. राज्याचा विकास करण्यासाठी जर हे सरकार शेतकर्यांचा बळी घेत असेल, तर तो विकास काय कामाचा? अशी भूमिका घेत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे या बैठकीत ठरले.
या आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांचे मृतदेह त्यांच्या जन्मगावी उरणला नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मुंबईतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्याप्रमाणे 18 तारखेला सायंकाळी 4 वाजता या तिघा हुतात्म्यांची अंत्ययात्रा हजारो कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत परळ येथील कामगार मैदानावरून काढण्यात आली. या अंत्ययात्रेत विविध पक्षांचे नेते, कामगार पुढारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा हजारो भूमिपुत्रांनी, शेतकर्यांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
16 तारखेला हुतात्मा झालेल्या नामदेव शंकर घरत आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्यावरही पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी तेथे डी. बी. किल्लेदार यांनी पुढाकार घेतला होता. त्या हुतात्म्यांची अंत्ययात्रा ससून हॉस्पिटलमधून निघून सदाशिव पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आली. त्या वेळी आंदोलनात प्रामुख्याने सहभागी असलेले रामशेठ ठाकूर, दशरथ ठाकूर, बी. के. ठाकूर, भारती पोवार हे नेते तसेच उरण, पनवेलमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
तसेच ज्या गंभीर जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते, त्यांची विचारपूस करून रामशेठ ठाकूर यांनी त्यांना सर्व प्रकारची मदतही केली. किंबहुना उरणमध्ये झालेल्या गोळीबाराचा विविध कामगार संघटनांनीही जाहीर निषेध केला.अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरकारवर खरपूस टीका केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांनी, शेतकर्यांनी मोर्चे काढून, निदर्शने करून शासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारने शेतकर्यांवर केलेल्या अन्यायाविरुद्ध विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …