कोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामध्ये जीवितहानीप्रमाणे वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते. या विजेमुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंचेदेखील नुकसान होत असल्याने किल्ले रायगडासह कोकणामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षदार आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आणि त्या वास्तूतील इतिहास भावी पिढीला ज्ञात करून देण्याचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाकडून केले जात असले तरी गेल्या 300-350 वर्षांत अनेक ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. काही वास्तू नामशेष करण्यात आल्या, तर काही नैसर्गिक घडामोडींमध्ये नष्ट झाल्या आहेत. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. पावसाळ्यात वादळवारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतो. रायगडावर तर या काळात परिस्थिती खूपच प्रतिकूल असते. गडावर सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस आणि दाट धुक्यांमुळे पुरातन वास्तूंची झीज, शेवाळ वाढणे आणि विजा पडल्यापुळे मोठे नुकसान होते. कोकणात अतिवृष्टी होण्याची अधिक शक्यता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे पुरातन वास्तूंचे नुकसान होऊ नये याकरिता पुरातत्त्व विभागाकडून उपाय योजले जातात. यामध्ये गडकिल्ल्यांवर असलेल्या वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. अनेक वास्तूंचे नुकसान वीज कोसळल्याने झाल्याचे आढळून आल्यामुळे किल्ले रायगडसह राज्यातील गडकिल्ल्यांवरील वास्तूंवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे. ही यंत्रणा आधुनिक स्वरूपाची असावी तसेच वारा आणि पाऊस मोजणारी यंत्रणादेखील अत्याधुनिक करण्यात यावी.किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाजवळ 10 ते 15 वर्षांपूर्वी वीज कोसळून काही प्रमाणात समाधीजवळच्या इमारतीचे नुकसान झाले. सुदैवाने समाधीस्थळाचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यानंतर राज्य शासनाने समाधीस्थळाजवळ वीज प्रतिबंधक यंत्रणा बसवली. गड संरक्षणासाठी उभारण्यात आलेली तटबंधी अनेक ठिकाणी कोसळली असून डोंगराच्या कोपर्यावरील खुबलढा बुरूजदेखील ढासळलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळतो. नाना दरवाजा, महादरवाजा, मदारशहाची कबर, या कबरीजवळ असलेला दोन मिटर उंचीचा लोहस्तंभ, कबरीच्या उजवीकडे असलेला हत्ती तलाव, गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती करण्यात आली नव्हती, परंतु प्राधिकरणाच्या माध्यमातून या तलावाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पावसाळ्यात पाण्याचा साठा तलावांमध्ये होतो. हा तलावही सुरक्षित राहण्याकरिता वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्याची आवश्यकता आहे. याच हत्ती तलावाच्या पुढे सुप्रसिद्ध गंगासागर तलाव असून या तलावाचेही संरक्षण करणे आवश्यक आहे़. तलावाच्या बाजूला सारसेनिक मुसलमानी स्थापत्य शैलीचे दोन भव्य मनोरे असून गेल्या 350 वर्षांत ऊन-पावसामुळे वरील भाग कोसळला असून सध्या दोन्ही मनोरे भग्नावस्थेत आहेत. याशिवाय पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणी वसा, राजभवन, रत्नशाळा, सदर व फड, सिंहासन, नगारखाना आदी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूंना विजेपासून संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. सिंहासनासमोर असलेली नगारखान्याची इमारत आजही सुस्थितीत असून गडावरील अत्यंत महत्त्वाची इमारत म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. गडावर असलेल्या श्री जगदीश्वर मंदिर, श्री शिरकाई देवी मंदिर त्याचबरोबर कुशावर्त तळ्याच्या बाजूला असलेले महादेवाचे मंदिर आहे. त्याच बाजूला सचिव आणि पंतप्रधानांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू रायगडावर आहेत. अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील राजगड, पन्हाळगड, विशाळगड, पुरंदर किल्ला, प्रतापगड, कुलाबा किल्ला आदी किल्ल्यांचे जतन करण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून जरी करण्यात येत असले तरी प्रत्येक गडावर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता योग्य ती यंत्रणा प्रत्येक गडकिल्ल्यावर कायमस्वरूपी बसविण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांपासून गडप्रेमी व शिवभक्तांकडून गडाची स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात येते. गड परिसर स्वच्छ करताना तेथील वास्तूंचीही साफसफाई करण्यात येते. वास्तूंचे संरक्षण होण्याकरिता वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी शिवभक्त व गडप्रेमींकडून केली जात आहे.
-महेश शिंदे