Breaking News

माथेरान पर्यटकांनी गजबजले; व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये उत्साह

माथेरान : रामप्रहर वृत्त

बंदी उठताच माथेरानमध्ये रविवारी (दि. 27) पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांत उत्साह संचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिक अडचणीत आले होते. पर्यटकांसाठी माथेरान खुले करावे, अशी मागणी भाजपतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारपासून माथेरान पर्यटकांसाठी खुले केले. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरान खुले झाल्याने मुंबई व परिसरातील पर्यटकांनी रविवारी माथेरानमध्ये गर्दी केली होती. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने पर्यटक आपल्या आवडीप्रमाणे बाजारपेठ भागात आपापल्या पसंतीच्या व्हेज, नॉनव्हेज पदार्थांची चव घेताना दिसत होते. वयोवृद्ध पर्यटकांना हातरिक्षा चालक विविध पॉइंट्सची सैर घडवून आणत होते, तर अश्वपालसुद्धा पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत होते. छोटे टपरीधारक आपल्या स्टॉल्सवर मका, चहा, भजी बनविण्यात मग्न होते. पर्यटकांच्या आगमनामुळे पॉइंट्सवरील टपरीधारकांनी समाधान व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळात अश्वपालकांनी नाईलाजाने आपले घोडे मालवाहतूक करण्यासाठी जुंपले होते. त्यांनाही आता मोकळीक मिळणार असल्याने अश्वपालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

माथेरान सुरू झाल्यामुळे आम्ही सहकुटुंब इथे फिरावयास आलो आहोत. काही दुकाने उघडी आहेत. सर्व बाजारपेठ उघडल्यास आणखीन छान वाटेल. पर्यटकांनी आता माथेरानला येऊन इथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा.

-नरेश माखिजा, पर्यटक, उल्हासनगर

केवळ पर्यटनावर अवलंबून असल्याने माथेरानला पर्यटन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यटक तसेच येथील व्यावसायिक आणि स्थानिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे माथेरानचे पावसाळी पर्यटन सुरक्षितरीत्या बहरेल.

-आकाश चौधरी, भाजप नेते, माथेरान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply