नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते.
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचा वापर करून अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटे लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.
होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणे शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावे. ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. सर्व राज्यांकडे लसीचे डोस उपलब्ध आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांचे लसीकरण झालेले असतानाही त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण लसीकरणाबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण असे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत केले.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper