Breaking News

पोलादपूरच्या कुडपणमध्ये पर्यटकांची गर्दी; एसटीअभावी ग्रामस्थ मात्र झालेत स्थानबद्ध

पोलादपूर : प्रतिनिधी

अनियमित एसटी बस सेवेमुळे पोलादपूर तालुक्यातील थंड हवेच्या कुडपण खुर्दमधील ग्रामस्थांना गाव सोडणे कठीण झाले असून, पर्यटक मात्र खासगी वाहनांनी ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या ब्रिटीशकालीन हिलस्टेशनचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पर्यटकांचा या दूर्लक्षित भागाकडे ओढा वाढला आहे. पावसाळ्यात येथील सृष्टीसौंदर्य डोळ्यांमध्ये साठविण्याइतपत अप्रतिम असून एरव्ही येथे थंड हवामान असते. त्यामुळे   पर्यटकांना या भागात वर्षभर येण्याची इच्छा असते. कुडपण खुर्दपर्यंत जाताना वाटेत मोरगिरी, खडपी, गांजवणे, देवपूर, पैठण, गोळेगणी, परसुले, क्षेत्रपाळ, आमलेवाडी, कुडपण बुद्रुक, मधले कुडपण, कुडपण बौध्दवाडी आणि कुडपण खुर्द आणि शेलारांचे कुडपण या लोकवस्त्यांना गेल्या दीड वर्षांतील कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन परिस्थितीत पोलादपूर तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची सुविधा उपलब्ध नाही. कुडपण खुर्द हे पर्यटन क्षेत्र असून क वर्गातून ब वर्गामध्ये सामील होण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात कुडपण खुर्दसाठी विविध योजनांद्वारे पर्यटनविकासाची दालने खुली होण्याची शक्यता आहे. राज्यातील एकमेव महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे जन्मगांव असलेल्या या कुडपणमध्ये भिमाची काठी हा सुळका आश्चर्यचकित करणारा आहे. कुडपण खुर्दमध्ये भराडी, भुतरान आणि आवेरी  अशा तीन नद्यांचा संगम आहे. अलिकडेच कुडपण खुर्द आणि कुडपण बुदु्रकदरम्यान एका कड्याजवळ एक पेव्हर ब्लॉकचा रॅम्प तयार करण्यात आला असून याठिकाणाहून या धबधब्यासह भिमाच्या काठीचे विलोभनीय दर्शन घडते. पावसाळा सुरू झाल्यापासून कुडपण परिसरात खासगी गाड्यांतून येणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढली आहे, मात्र एसटी अभावी स्थानिक ग्रामस्थांना गावाबाहेर पडणे मुस्कील झाले आहे. पोलादपूर ते कुडपण खुर्द अशी एसटी गाडीची फेरी सुरू झाल्यास स्थानिक ग्रामस्थांनासह पर्यटकांनादेखील  सुविधा उपलब्ध होईल, अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. फेरीमागे तीन हजारांचे उत्पन्न मिळत नसल्यावरून राज्य परिवहन मंडळाने  मोठी बस बंद केली, मात्र येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी किमान लहान गाडी पाठवावी, अशी मागणी कुडपण खुर्द मधलीवाडीतील जावजीबुवा चिकणे यांनी केली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply