कोपा अमेरिका स्पर्धेची आज हायव्होल्टेज फायनल
ब्यूनस आयर्स ः वृत्तसंस्था
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शनिवारी नेमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना या दोन फुटबॉलवेड्या देशांच्या संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देतील. या सामन्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोरोना महामारीमुळे ऐनवेळी ब्राझीलला या स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले आणि त्यानंतर देशभरात या यजमानपदाचा विरोध होत असतानाही ब्राझीलने अंतिम फेरी गाठली.
अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यामध्ये अनेक सामने झाले असले, तरी कोणत्याही स्पर्धेत ते केवळ चार वेळाच अंतिम फेरीत भिडले आहेत. 1937च्या दक्षिण अमेरिकी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलला 2-0ने नमवले होते. यानंतर 2004च्या कोपा अमेरिका अंतिम लढतीत ब्राझीलने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारली होती. त्यानंतर एका वर्षाने जर्मनीत झालेल्या कॉन्फेडरेशन कप अंतिम लढतीत ब्राझीलने अर्जेंटिनाला 4-1 असा धक्का दिला होता तसेच 2007 साली कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ब्राझीलने अर्जेंटिनावर 3-0 असे वर्चस्व राखले होते.