Breaking News

चिरनेरचे आदिवासी अद्यापही रस्त्याविना; ग्रामपंचायतीचा उदासीन कारभार

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने त्यांना नवा थाट लाभला आहे, मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगरकुशीत वास्तव्य करणार्‍या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी- आदिवासींना अद्यापही चिखलाची वाट तुडवत घर गाठावे लागत आहे. या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच 17 लाखांचा निधी मंजूर होऊनही कमिशनच्या वादात या निधीतील एक रुपयाही रस्त्यावर खर्च न केल्याने आदिवासींना हे भोग भोगावे लागत असल्याने आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक वाडी वस्तीवर रस्ता हे शासनाचे धोरण असतानाही चिरनेरच्या आदिवासींना अजूनही रस्त्याविना राहावे लागले आहे. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत पाच आदिवासी वाड्या असून त्यापैकी केल्याचा माळ या आदिवासी वाडीवर अजूनही पक्का रस्ता नाही. चिरनेर गावातून आदिवासी पायवाटेने त्यांच्या तीन किमी दूर डोंगरात असलेल्या वाडीवर मार्गस्थ होतात. त्याचबरोबर रानसईचे आदिवासी बांधवही याच रस्त्यातून आपल्या डोंगरातील गावात जातात. या आदिवासी वाडीपर्यंत रस्ता व्हावा म्हणून चिरनेर गावातील शेतकर्‍यांनी दातृत्वाच्या भावनेतून आपल्या शेतजमिनीतील काही जागा रस्त्यासाठी दिल्या आणि गावातील सेवाभावी पी. पी. खारपाटील व राजेंद्र खारपाटील यांनी या आदिवासींसाठी कच्चा रस्ता बनविला. हा रस्ता पक्का करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे 17 लाखांचा निधीही मंजूर झाला होता, मात्र हे काम कमिशन कसे घ्यावे या स्थानिक सत्ताधार्‍यांच्या वादात अडकल्याची चर्चा आहे. आदिवासींना पक्का डांबरी रस्ता देण्याऐवजी चिरनेर ग्रामपंचायत या रस्त्याच्या कामाबाबत गेली दोन वर्षे उदासीनता दाखवत असून आदिवासींच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे भर पावसात आदिवासींना गुडघाभर चिखलातून वाट शोधत आपले घर गाठावे लागत आहे. उरणचे रस्ते चकाचक आणि आदिवासी वाडीवरील रस्ते चिखलमय हा दुराभास दिसत असल्याने चिरनेर ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा यातून दिसून येत आहे. पक्का रस्ता द्याल तेव्हा द्याल, किमान या कच्च्या रस्त्यावरील चिखलाच्या वाटेवर दगडमातीचा भराव केला तरी चालणे शक्य होईल तसेच आदिवासी समाजावर उपकार होतील, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी समाजातून व्यक्त होत आहे.

आमचा समाज अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून जगतो. गावात येऊन लाकडाच्या मोळ्या विकल्यावर काही पैसे मिळतात, मात्र सध्या कच्च्या रस्त्यात चिखल झाल्याने ओझे घेऊन रस्त्यातून चालणे धोक्याचे ठरत आहे. आमच्या वाडीपर्यंत राज्य सरकारने लवकरच डांबरी रस्ता करावा अशी अपेक्षा आहे.

-सिद्देश कातकरी, आदिवासी तरुण, केल्याचा माळ वाडी, चिरनेर

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply