Tuesday , February 7 2023

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य पोलादपूर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. प्राणाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपणचे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा उदयभान यास कंठस्नान घालून मोगलांच्या ताब्यातील कोंढाणा जिंकला. मुलगा रायबाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण तानाजीने दिले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण माझा सिंह गेला आणि या कोंढाणा किल्ल्याला त्यांनी सिंहगड हे नाव दिले. नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा उमरठ येथे आहे. तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी उमरठला आहे. आज तानाजी मालुसरे यांचे वंशज उमरठ, साखर, महाड येथे आहेत. तर शेलारमामा यांचे वंशज कुडपण येथे आहेत. साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी दिलेली कवड्याची माळ त्यांच्या वंशजांनी जपून ठेवली आहे. इतिहासाची थोर परंपरा आपण जपली पाहिजे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पोलादपूर तालुक्यावर निसर्गाने मुक्त हसे उधळण केली आहे. मिनी महाबळेश्वर किंवा रायगडचे काश्मीर म्हणून ओळख असलेले कुडपण हे थंड हवेचे ठिकाण आहे. भिमाची काठी, 800 फुटांवरून कोसळणारा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा धबधबा, राजाराणी पॉईंट येथे आहे. 700 पाकिस्तानी सैन्याला ठार मारून भारताला विजय मिळवून देणार्‍या महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णा सोनावणे यांचे स्मारक इथे आहे, मात्र तिथे या महापराक्रमी वीराचे शासकीय स्मारक होणे जरुरी आहे. कुडपण येथे शेलारमामा यांचे वंशज आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी कुडपण येथे शेलारमामा यांचे स्मारक होणे ही काळाची गरज आहे. असे म्हटले जाते की, जी माणसे इतिहास जपतात, तीच माणसे पुढे इतिहास घडवतात. सावित्री, घोडवनी, चोळई, जगबुडी या नद्यांनी येथील परिसर समृद्ध बनवला आहे. रानबाजीरे धरण पोलादपूरवासीयांची तहान भागवत आहे. भविष्यात पांगलोली येथे तयार होणारे धरण हे या भागातील गर्द वनश्री आणि भाजीपाला आधिक फुलवणार आहे. घागरकोंड येथील झुलता पूल आणि नायगारा सदृष्य धबधबा पहायला हजारो पर्यटक दरवर्षी येतात. मोरझोतचा धबधबा पावसाळी पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने काही चित्रपटांचे चित्रीकरण आड, कुडपण येथे झाले आहे. कार्तिकी एकादशीला हजारो भाविक तुर्भे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. देवपूर येथील शिवमंदिर आणि वाघजाई कोंडजाई मंदिरात अनेकजण दरवर्षी येतात.पोलादपूर येथे भरणारी कालभैरव यात्रा हे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे आकर्षण आहे. रामनवमीला जिल्ह्यातील अनेक रामभक्तांची पावले धामणदेवीला वळतात. कापडे येथील रामवरदायिनी मंदिर आणि इथे भरणारी यात्रा पोलादपूर आणि महाड वासीयांचे श्रध्दास्थान आहे. प्रतापगड किल्याच्या पायथ्याशी देवळे येथे असणारे पुरातन शिवपुराण मंदिर हे लाखो शिवभक्तांच श्रध्दास्थान आहे. शिवकालीन कवी परमानंद यांचे पोलादपूर येथे स्मारक आहे. आकाशाला भिडणार्‍या सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, महाबळेश्वर वरून कोकणात येणारी एकमेव सावित्री नदीदेखील इथले आकर्षण आहे.आंबा, फणस, काजू, कोकम या फळांबरोबर दूध, दही, तूप आणि मध यांनी पोलादपूर संपन्न आहे. पोलादपूरची लसणीची चटणी आणि कुडपणची तिखट चटणी रायगड जिल्ह्यात प्रसिध्द आहे. येथील नद्यांमध्ये मळे, डाकू, खऊल, वाम हे सापडणारे मासे मत्स्यखवय्यांची भूक भागवतात. जंगली रानभाज्या विपुल प्रमाणात सापडतात. कोंढवी, कांगोरीगड आणि ओंबळी येथील मीठ कडा किल्ला हे दुर्गभ्रमती करणार्‍यांना भुरळ घालतात. इथला आंबेनळी आणि कशेडी घाट पर्यटकांना साद घालतो. पोलादपूरमधील अनेक जण आज सैन्यदलात आणि पोलीस मध्ये आहे. फौजी देवपूर म्हणून ओळखले जाणारे देवपूर पोलादपूर मधीलच.. तालुक्यातील अनेक जण वारकरी सांप्रदायात आहेत. येथील अखंड हरिनाम सप्ताहात हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित असतात. पोलादपूर तालुका सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाबळेश्वर आणि गोवा येथे इथूनच रस्ता जातो. ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पोलादपूरचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच करता येईल. मुंबई, पुणे, बडोदा येथे कामानिमित्त जाणारा तरुणवर्ग इथेच राहील. इथल्या बेरोजगारांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. या पोलादपूर तालुक्याबद्दल मला असे म्हणावेसे वाटते की, प्रयाग, काशी, मथुरा , वृंदावन हे कोणाला? नसेल ठेवा पोलादपूर त्या हतभाग्याला।

-मिलिंद खारपाटील, पनवेल

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply