Breaking News

रायगडात कोसळधार

  • जिकडे तिकडे पाणीच पाणी
  • जनजीवन विस्कळीत; तीन जण बेपत्ता

अलिबाग ः प्रतिनिधी
सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 19) पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पाणी शिरून परिसर जलमय झाल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी दरडी कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तीन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला. जिल्ह्यात तब्बल दोन हजार 984.20 मिलिमीटर पाऊस बरसला असून पनवेल तालुक्यात सर्वाधिक 284.20 पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला, पण हवामान खात्याकडून अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात  कर्जत, पनवेल आणि म्हसळा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे तीन जण पाण्यात बुडाले. हे तिघेही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील खाडीत मासेमारीसाठी गेले असता बोट उलटल्याने दोघे जण बुडाले. यातील एक जण बचावला, तर सर्वेश हरेश कोळी (वय 42) हा बेपत्ता झाला आहे. कर्जत तालुक्यातील पोशिर नदीत पोहायला गेलेल्या प्रमोद जगन जोशी (वय 26, रा. देवपाडा, ता. कर्जत) हा नदीच्या मुख्य प्रवाहात बुडाला. याशिवाय पनवेल तालुक्यातील पोयंजे पाली धरणात पोहायला गेलेल्या तिघांपैकी दीपक गंभीरसिंग ठाकूर (वय 24, रा. कळंबोली) हा तरुण बुडाला. या तिघांचाही शोध सुरू आहे.
 सतत पडत असलेल्या  पावसामुळे रायगडातील अंबा, कुंडलिका, बाळगंगा  या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या. बाळगंगा नदीला पूर आल्याने  दूरशेत, बळवली, खरोशी या गावांना जोडणारे रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले. काही घरांमध्ये पाणीही घुसले. यात दूरशेतमधील चार घरांचे नुकसान झाले. जिते चुनाभट्टी येथील 20 घरांमध्ये पाणी गेल्याने या कुटुंबांना त्यांच्या नातेवाइकांकडे स्थलांतरित करण्यात आले. तांबडशेत जोहे-रस्ता पाण्याखाली गेला होता.
बाळगंगा नदीच्या पुराचे पाणी जिते गावजवळ मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. अंबा नदीला पूर आल्यमुळे नागोठणे एसटी स्टँड व कोळीवाडा परिसरात पाणी शिरले होते. अलिबाग तालुक्यातील भानंग येथे रस्त्यावर पाणी आल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दिघी-माणगाव मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती, तर आपटा खिंडीत पाणी शिरल्याने कर्जत-पेण मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. नेरळ-माथेरान घाटात जुम्मापट्टी भागात दरड कोसळली. त्यामुळे घाटरस्ता वाहनांच्या वाहतुकीस बंद झाला होता, परंतु स्थानिक आणि टॅक्सीचालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली.
पनवेल तालुक्यातील आपटा, डोलघर, कर्नाळा नाका, उसर्ली आदी ठिकाणी पाणी शिरले होते तसेच गाढी नदीचे पाणी पात्र ओलांडून वस्तीत आल्याने पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला येथील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.
खालापूर तालुक्यातील वांगणी (केळवली) येथील आदिवासीवाडीमधील दीपक वाघमारे, अशोक पवार व नितीन वाघमारे यांच्या घरामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरले. या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे भागात गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पनवेल 284.20, मुरूड 270, माथेरान 268.40, तळा 210, माणगाव 207, रोहा 202, खालापूर 195, कर्जत 194.60, पेण 180, सुधागड 166, श्रीवर्धन 163, म्हसळा 159, उरण 151, अलिबाग 123, पोलादपूर 122, महाड 89, एकूण दोन हजार 984.20, सरासरी 186.51, टक्केवारी 59.51.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply