नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशाच्या कानाकोपर्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. यासाठी रात्रंदिवस झटणार्या ऑक्सिजन वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) मन की बात कार्यक्रमातून कौतुक केले. या वेळी त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी देशातील विविध भागांत पुरवल्या जाणार्या ऑक्सिजनबद्दल चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रेल्वे, जहाज आणि विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणार्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबतही संवाद साधला तसेच त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी देशात मागच्या काही दिवसांत येऊन गेल्या चक्रीवादळांबद्दलही बोलले. अलिकडेच 10 दहा दिवसांपूर्वी देशाने दोन चक्रीवादळांना तोंड दिले. पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकले, तर पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाने तडाखा दिला. या चक्रीवादळांत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले.