कर्जत : बातमीदार
नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकार्यामार्फत प्रचंड लूट झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामपंचायत देत नसल्याने किती आर्थिक घोटाळा आहे? याबाबत ग्रामस्थांत कुतूहल निर्माण झाले आहे. ममदापूर येथील सचिन अभंगे यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामनिधी आणि 15 टक्के अनुदानातून करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत मोठी तफावत असल्याचा दावा केला आहे. दलित वस्तीकरिता 17 मार्च 2020 रोजी 55 हजार 100 एवढा खर्च करून 100 नग फायबर खुर्च्या खरेदी केल्या, तर 1 जून 2020 रोजी 80 हजार रुपये खर्च दाखवून फायबरच्या 200 खुर्च्या खरेदी केल्या.त्या बदल्यात नेरळमधील जनता भांडी भांडार यांना बिल अदा केले आहे. प्रत्यक्षात मात्र त्या 300 खुर्च्या ममदपूर गावात अद्याप पोहचल्या नाहीत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ई निविदा काढण्यात आल्या नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य श्रावस्ती अभंगे यांनी केला आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने आदिवासी वाडीसाठी भांडी खरेदी केली असून त्यात अल्युमिनियमचे पातेले, त्यावर झाकण व 21 प्रकारची स्वयंपाकाची भांडी यांचा समावेश आहे. त्याच्या पावणे दोन लाख रुपये रकमेच्या पावत्या जनता भांडी भांडार यांच्या नावे आहेत. प्रत्यक्षात मात्र या भांडी खरेदीसाठी तब्बल दोन लाख 52 हजाराचे बिल अदा करण्यात आले आहे, पण त्या बदल्यात साधा चमचादेखील खरेदी झाला नसून कोणतीही भांडी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहचली नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य अभंगे यांचा आहे. येथील दलित वस्तीसाठी 50 नग केटरिंग टेबल एक लाख 77 हजार खर्चून खरेदी करण्यात आले, त्याचे बिल अदा झालेले असताना कोणतीही वस्तू प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये पोहचली नाही. या वस्तूंची खरेदी कागदोपत्री झालेली आहे. बिल अदा करण्यात आले आहे, पण जीएसटी, सीएसटी कराबाबत कुठेही उल्लेख दिसून येत नाही. थेट निवडून आलेले ममदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दामू निरगुडा हे आदिवासी समाजाचे आहेत. त्याचा गैरफायदा ग्रामविकास अधिकार्याने उचलला आणि लाखोंचा अपहार केला असल्याचा अभंगे यांचा आरोप आहे.
ममदापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्याने आपल्या मर्जीतील दुकानदारांना परस्पर पैसे देऊन हात धुवून घेतले आहेत. त्याची चौकशी करावी यासाठी आम्ही माहिती मागत असून ग्रामविकास अधिकारी माहिती देत नाहीत. कर्जत पंचायत समितीने कॅश बुक तसेच 14 वित्त आयोगाचा आराखडा पुन्हा तपासून घेतला पाहिजे.
-श्रावस्ती अभंगे, सदस्य, ग्रामपंचायत ममदापूर, ता. कर्जत
माहितीचा अधिकारानुसार आपल्याकडे मागितलेली माहिती अर्जदारांना देण्यात आली असून, सर्व वस्तूंची नियमानुसार खरेदी केली आहे.
-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत ममदापूर, ता. कर्जत