Breaking News

आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या नक्षलीचा खात्मा

छत्तीसगड ः वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली.

दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे. छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे महासंचालक गिरधारी नायक यांनी सांगितले की, चकमकीत खात्मा झालेला नक्षली वर्गीस याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम होते आणि तो सुरुंगद्वारे स्फोट घडवण्यात तज्ज्ञ होता. भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दंतेवाडा जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी नक्षलवादी हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या गाडीत सुरक्षा दलातील चार जवानही होते. तेदेखील या हल्ल्यात शहीद झाले होते. मंडावी हे बचेली गावातील प्रचारसभा आटोपून नकुलनारकडे परतत असताना शामगिरीजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. भीमा मंडावी हे 2008मध्ये दंतेवाडा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले होते. 2013च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देवती कर्मा यांनी त्यांचा पराभव केला होता. 2018 मधील निवडणुकीत मंडावी पुन्हा विजयी झाले होते. बस्तर भागातील भाजपाचे ते एकमेव आमदार होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply