Breaking News

सायबर गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?

भारतात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहू शकेल.

दैनंदिन आयुष्यातील तंत्रज्ञानाचा वाढता वापर म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी स्थिती झाली आहे. म्हणजे त्याचा अतिवापर केला, तर त्याचे दुष्परिणाम आहेत, तर त्याचा स्वीकार केला नाहीतर आपण जगाच्या मागे राहू किंवा आपली कामे वेगाने होणार नाहीत, असे वाटत राहते. या दोन्हीही गोष्टी खर्‍या आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान विवेकाने वापरणे, एवढा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. नव्या सुविधांना दोष देण्याची पद्धत आपल्याकडे लोकप्रिय आहे. काहीही नवीन आले की त्याच्यामागे कोणाचा काय हेतू आहे, याची चर्चा केली जाते आणि आजूबाजूचे सर्व लोक त्या सुविधा वापरू लागले की हळूच आपणही त्या वापरण्यास सुरुवात करावयाची, असे अनेक जण करतात. तर दुसरीकडे प्रत्येक नवी सुविधा, तंत्रज्ञान वापरण्याचा अतिरेक करणारेही अनेक जण आहेत. अशा दोघा समूहांना विवेकाची गरज आहे.

अलीकडेच समोर आलेल्या एका माहितीच्या पार्श्वभूमीवर याचा विचार अधिक गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात दरवर्षी एक पाहणी करते. 2021ची पाहणी तिने नुकतीच जाहीर केली आहे. या वर्षी तिने 16 देशांचा अभ्यास केला, ज्यात भारताचाही समावेश होता. पाहणीत लक्षात असे आले की ‘कॉल सेंटर’च्या मार्गाने भारतात सायबर गुन्हे करून पैसे लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. पाहणीनुसार या 16 देशांतील 10 पैकी सात गुन्हे भारतात घडत आहेत. भारतात मोबाईल फोनचा वापर जसजसा वाढत चालला आहे, तसे सायबर गुन्हेही वाढत चालले आहेत, असा याचा अर्थ.

कॉल सेंटर – फसवणुकीची केंद्र

अर्थात, या आकडेवारीने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण पाहणी करणार्‍या कंपनीने या 16 देशांतील इंटरनेट वापरणार्‍या 16 हजार 254 नागरिकांचाच सर्व्हे केला आहे. त्यामुळे तो शंभर टक्के बरोबर असण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण पाहिले तर ते धक्कादायक म्हणता येत नाही. या पाहणीतून बोध एकच घ्यायचा, तो म्हणजे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले असून, त्याचा फटका आपल्याला बसणार नाही, याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांविषयी आपण सजग राहिलो, तरी पुरेसे आहे. उदा. ऑक्टोबर 2019 मध्ये कोलकता पोलिसांनी तेथे चालणार्‍या दोन कॉल सेंटरवर छापा टाकून ती बंद केली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीमधील अशाच कॉल सेंटरवर छापा टाकून 63 जणांना अटक केली होती. जून 2021 मध्ये गुरूग्राममध्ये आठ, तर फरिदाबादमधील दोन कॉल सेंटर कारवाई करून बंद करण्यात आले. गावाची नावे ही आपल्यापासून खूप दूरची आहेत, म्हणून त्यांचा आपला संबंध नाही, या भ्रमात राहता कामा नये. कारण तंत्रज्ञानामुळे विशेषतः इंटरनेटमुळे ही सर्व अंतरे संपुष्टात आली आहेत. शिवाय पुण्या-मुंबईतही गेल्या काही वर्षात अशा टोळ्या पकडल्याची उदाहरणे आहेतच.

भारतीय बाजारपेठेचे महत्त्व

आपल्याला प्रश्न पडू शकतो की, मायक्रोसॉफ्ट कंपनीला या सायबर गुन्ह्यांची काळजी का वाटते, तर त्याचे कारण असे आहे की कॉलसेंटरवर जे व्हाईटकॉलर तरुण काम करतात, म्हणजे आपल्याला फसविण्यासाठी फोन करतात, ते आपण मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात. जगातील अशा मोठ्या कंपनीच्या नावाने जर फसवणूक होऊ लागली, तर ते कंपनीच्या प्रतिमेला तडा जाणारे ठरेल. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाविषयी भीती वाढली, तर ते वापरणारे कमी होऊ शकतात, असेही या कंपनीला वाटू शकते. तिनेही पाहणी करण्यासाठी भारताची निवड केली, त्याचे कारणही अगदी उघड आहे. ते म्हणजे या कंपनीचे ग्राहक भारतात फार वेगाने वाढत आहेत. कारण कोरोना काळातील अभूतपूर्व परिस्थितीत स्मार्ट फोन, संगणक, लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा वापर प्रचंड वाढला आहे. विशेषतः मुलांना शालेय शिक्षण ऑनलाईन घ्यावे लागत असल्याने या काळात या तंत्रांचा वापर वेगाने वाढला आहे. अगदी ज्यांनी ऑनलाईनला आतापर्यंत आपल्या आयुष्यात अजिबात स्थान दिले नव्हते, त्या सर्वांना त्याचा स्वीकार करावा लागला आहे. अशी प्रचंड बाजारपेठ अबाधित राहावी, यासाठी अशा कंपन्या खबरदारी घेणार, हे ओघाने आलेच.

माहिती म्हणजे तिजोरीचे दार

कॉल सेंटरमध्ये काय चालते, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. काही तरुण एकत्र येतात. ते काही नागरिकांचा डेटा कोठून तरी मिळवितात. त्याचा अभ्यास करतात आणि त्यातील काही जण हेरून त्यांना फोन करतात. आपण या या कंपनीचे प्रतिनिधी असून तिने फार चांगली योजना आणली आहे, ती तुम्हाला हवी असल्यास आपली थोडी माहिती हवी आहे, असे सांगतात. इतर माहिती घेता घेता आपली जन्मतारीख, आपले बँक खाते क्रमांक, आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक, त्याच्या मागील तीन आकडे, बँकेचा पासवर्ड अशी सर्व माहिती मिळवून आपल्या खात्यातील रक्कम लंपास करतात. बँकेतून पैसे गेल्यावर एसएमएस येतो, तेव्हा ते लक्षात येते, पण त्याचा काही उपयोग नसतो. कारण तोपर्यत अशा कॉल सेंटरमधील मुलगा किंवा मुलीने, आपल्याला फोन ज्या सीममधून केलेला असतो, ते सीम फेकून दिलेले असते! आपण पोलिसांत तक्रार देऊ शकतो आणि बँकेकडेही तक्रार करू शकतो, पण आपणच आपल्या तिजोरीचे दार उघडे करून दिलेले असल्याने आपले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते.

भारतात प्रमाण अधिक – पाच कारणे

भारतात असे प्रकार जास्त होतात, हा या पाहणीतील निष्कर्ष खरा मानला, तर त्याची कारणे शोधली पाहिजेत. ती अशी आहेत. 1. भारतीय माणूस हा भावनिक असल्याने त्याला फसविणे सोपे आहे. भावनिक असणे हे वाईट नाही, पण डिजिटल युगात ते महागात पडू शकते. 2. प्रत्येकासाठी वेगळा स्मार्ट फोन, संगणक, लॅपटॉप आणि डेस्कटॉप अशी भारतात स्थिती नाही. ही सर्व यंत्रे आपण शेअर करतो. अर्थातच, प्रत्येक जण त्यावर वेगवेगळ्या साईट पाहत असतो. त्यातील काही साईट या फसव्या किंवा डेटा चोरण्याचे काम करत असतात. त्यांच्यामार्फत डेटा मिळवून फसविणे गुन्हेगारांना सोपे होते. 3. सर्व प्रकारचे शिक्षण आणि नोकरी व्यवसायाची कामे ऑनलाईन होऊ लागल्याने गेली दोन वर्षे ही यंत्रे वापरणारे अजूनही नवशिके आहेत. त्यामुळे एका छोट्या कृतीने एवढे मोठे नुकसान होऊ शकते, याची अनेकांना जाणीव नाही. 4. गुंतवणुकीचे नवे मार्ग चोखाळताना शेअर बाजार आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. विशेषतः बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणारा डिजिटली अधिक साक्षर असण्याची गरज आहे. पण त्या स्थितीत अजून फार कमी भारतीय पोचले आहेत. त्यामुळे पासवर्ड सांभाळणे आणि त्यासंबंधीच्या भाषेचा सराव होणे गरजेचे आहे. 5. स्मार्ट फोन, संगणक, लॅपटॉप आणि डेस्कटॉप ही यंत्रे जेव्हा दुरुस्तीला दिली जातात, तेव्हा ती दुरुस्त करणार्‍यावर आपला विश्वास असतो, पण पुढे त्याचा वापर कोण करणार आहे, यावर नियंत्रण राहीलच, असे होत नाही. अशा वेळी सर्व डेटा सुरक्षित राहील, याची काळजी घेतली जात नाही.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply