Breaking News

खरेदी आपण गरज म्हणून करतो, की ती आपल्याकडून करून घेतली जाते आहे?

काय खरेदी करावे आणि काय नाही, हे ठरविणारे सर्वस्वी आपण असलो पाहिजे. पण आपल्या खरेदीवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशा कोणत्या बाह्य गोष्टी आपल्या खरेदीवर परिणाम करतात, ते आपण पाहूयात.

जर आपण काही ऑनलाईन खरेदी करावयाचे ठरविले आणि सहज त्या वस्तूचा शोध घेतला, तर नंतर तुम्ही मोबाईलवरील इतर अ‍ॅप वापरत असताना किंवा कोणतीही कामाची गोष्ट करण्यासाठी अगदी तुमच्या लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवरून इतर कोणतीही वेबसाईट उघडल्यास आपल्याला ती वस्तू स्क्रीनवर दिसू लागते. कधी कधी तर त्यासंबंधीचे फोनही येऊ लागतात. यालाच म्हणतात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याचं होतं असं की तुम्ही शोध घेतलेल्या सर्व गोष्टी आणि त्याबरोबरीनं तुमचा ठावठिकाणा (लोकेशन) व खरेदी केलेली असल्यास त्याचा मागोवा ह्या गोष्टी गूगल किंवा त्यावरील लावलेले ट्रॅकर देखील, आपल्या सर्व्हरवर साठवून ठेवतात आणि संबंधित क्षेत्रातील कंपन्यांना पुरवतात. जे काम आधी जस्ट डायल नावाची कंपनी करत असे, ते फक्त आता सगळं तांत्रिकरीत्या आणि आपोआप. म्हणजे तुम्ही जिथं राहत असाल किंवा त्यापेक्षा ज्या ठिकाणी (लोकेशनवर) जास्त वेळ असाल उदा. ऑफीस तिथं जवळपास एखादं नवीन कॅफे अथवा रेस्टॉरंट चालू झाल्यास आपोआप तुम्हाला त्याबाबतीत माहिती मिळते, तसेच तुमची केलेली खरेदी ही तुमची आवड-निवड लक्षात ठेऊन त्याप्रमाणे तुम्हाला त्या बाबतीतच्या जाहिराती पुरवण्यास सहाय्य करतं. आता हे झालं आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल.

आज आपण पाहूयात आर्टिफिशिअल इन्फ्लेशन बद्दल, म्हणजेच कृत्रिम भाववाढ. खरं तर याला भाववाढ म्हणणं तितकंसं योग्य ठरत नाही, परंतु समजून घ्यायच्या दृष्टीनं तरी तसं म्हणण्यास हरकत नाही. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. याबाबतीत व्याजदर हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. व्याजदर कमी असताना अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीचा पैसा फिरत असतो, पण व्याजदर वाढल्यास हाच पैसा गुंतवला जात असतो आणि म्हणूनच महागाई वाढल्यास व्याजदर वाढवले जातात व महागाईचा दर कमी झाल्यास व्याजदर कमी केले जातात.  भाव-वाढ, महागाई ही अनेक प्रकारे होऊ शकते,  एकतर पुरवठ्यासमोर मागणी वाढल्यास ज्याच्या अंतर्गत नैसर्गिक बदल, आवड-निवडीतील बदल (मानसिकता) या गोष्टी मोडू शकतात. मग एखाद्या गोष्टीची मोनोपॉली असल्यास, अर्थव्यवस्थेत जास्त पैसे आल्यास इ. यांपैकी पहिल्या दोन गोष्टी म्हणजे मागणी-पुरवठा व नैसर्गिक बदल आणि मोनोपॉली यामुळे होणारी भाववाढ ही पुन्हा पूर्ववत होऊ शकते, जसे की अमूक एका हीरोनं ठराविक बूट घातल्यानं काही काळ त्याची क्रेझ तरुणांमध्ये राहते व त्या प्रकारच्या वस्तूस मागणी वाढते. त्याचप्रमाणे नैसर्गिक म्हणजे सिझनल भाव-वाढ. उदा. पावसाळ्यात छत्री व रेनकोटची मागणी वाढल्यानं अशा गोष्टी महागतात. मोनोपॉलीमध्ये देखील काही काळानं दुसरा स्पर्धक आल्यावर सगळं अवसान गळलेलं आपण अनुभवलं देखील आहे (उदा. जिओ).

बाकीच्या दोन गोष्टी म्हणजे बदललेली मानसिकता व खिशातील जास्तीचा पैसा या गोष्टी या कृत्रिम भाववाढीसाठी पूरक ठरू शकतात. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मानसिकतेमधील बदल हा आपल्या आर्थिक नियोजनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो.

जर आपल्याला कलिंगडं आवडत असतील, तर आपण ती विकत घेऊन खातोच, परंतु आंब्यांच्या दिवसात आपली आवड नैसर्गिकरीत्या बदलते व आपण कलिंगडांकडं पाठ फिरवून आंब्यांच्या खरेदीस जातो, मग दोन्हीच्या भावात मोठी तफावत असेल तरी देखील, परंतु आपल्या खिशात खूप जास्त पैसा असल्यास अचानक आपल्याला आंब्यांपेक्षा उत्तम प्रतीचा सुका मेवा आपल्या रोजच्या आहारात असावा असा विचार येतो व आपण नेहमीपेक्षा कमी आंबे घेऊन त्याच्या अनेक पटीत असलेल्या भावातील बदाम घेऊन घरी येतो. हीच ती कृत्रिम मागणी व अशानं वाढणारी महागाई.

याच प्रकारचे उदाहरण म्हणजे, कंपनीत मोठ्या पदावर प्रमोशन झाल्यावर दुपटीनं वाढलेला पगार दर महिन्याला खात्यात जमा होताना पाहून आपसूकच आपण मोठ्ठा फ्लॅट किंवा फार्महाऊस किंवा सेकंड होममध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त होतो. (इथं आपण हे विचारात घेत नाही की आपली खरंच गरज वाढलीय की गरजेची व्याख्या बदलली गेलीय!) दुसरं उदाहरण घेऊ वाहन क्षेत्रातील. अगदी मागच्याच आठवड्यात माझे क्लायंट वजा मित्र सांगत होते की त्यांची 8 वर्षांची चिमुरडी लेक त्यांच्या (आय-20) गाडीतून शाळेत जायला नाक मुरडते. कारण विचारल्यावर कळलं की तिच्या मैत्रिणी एकतर लांबलचक सेडानमधून तरी येतात नाहीतर रूफ ओपन एसयूव्हीमधून! म्हणजे प्रश्न पडतो की आता लेकीला ‘उत्तम शिक्षण’ नावाखाली उत्तम शाळेत शिकायला पाठवायचं की आपलं स्टँडर्ड चेक करायला?

अजून एक अगदी साधं उदाहरण घेऊयात. आता-आतापर्यंत केवळ उच्चभ्रू लोकांनाच परवडणारी स्टारबक्स कॅफे जॉईंट्स ही आता सामान्य तरुणाईनं बहरलेली दिसत आहेत. छोट्या मिटिंग्जसाठी हमखास मिटिंग पॉईंट म्हणून ठरलेली पुण्यातील रूपाली-वैशाली, अथवा दादरच्या मद्रास कॅफे यांसारखी सुप्रसिद्ध दर्जेदार रेस्तराँची जागा, कॉफी-डे ने केव्हा बळकावलीय हे कळलंच नाहीय आणि प्रतिमाणसी 30 रुपयांचा खर्च 300 रुपयांच्या घरात केव्हा गेला हे देखील…

मोठ्या शहरातील प्रत्येक जण या ना त्या कारणानं मॉलमध्ये जातच (तूर्तास त्यात कोरोनामुळे खंड) असतो. जर बारकाईनं लक्षात घेतलं, तर मॉलमधील एस्कलेटर्स हे कधीच एकाखाली एक नसतात, (वास्तविकतः तसं करणं सोपं व सोयीस्कर जाईल) तर वेगवेगळ्या टोकास असतात जेणेकरून एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी अनेक दुकानं पार करत जावं लागेल व अप्रत्यक्षपणे त्या दुकानांतील गोष्टींची जाहिरात होऊन चांगलं कलेक्शन दिसल्यानं खरी गरज नसताना खरेदी केली जाईल. तसंच अशा मॉल्समध्ये सिनेमा हॉल, विविध रेस्तराँ, लाऊंज व तितकीच विविध बँकांची एटीएम्स असतील, परंतु गुंतवणूक सल्लागाराचं ऑफीस चुकूनही सापडणार नाही आणि यदाकदाचित आढळल्यास ते चालणार देखील नाही याचं कारण, मानसिकता. तिथं येणारी व्यक्ती याच मानसिकतेत आलेली असते की मी आज इथं काहीतरी खर्च करायला, चैन करायला, पैसे उडवायला, उपभोग घ्यायला आलोय. डिजिटल मार्केटिंगच्या भडिमारानं आपल्यासमोर अनेक नको असलेल्या गोष्टी नाचवल्या जातात आणि आपण देखील त्यात नकळत काही प्रमाणात गुंततो. आपल्या असलेल्या गरजा फुगवल्या जातात, नसलेल्या गरजा निर्माण केल्या जातात, आपलं बजेट ताणलं जातं, परंतु आपलं तात्पुरतं बनवलं गेलेलं स्टेटस आपल्याला तो अधिभार सहन करावयास लावतं. आता तर, अशा हौसे-मौजेकरिता कर्ज देणार्‍या कंपन्यांची देखील सध्या कमतरता नाहीय.  मग अशी खरेदी साहजिकच महागाई वाढवते व ज्याची काही दिवसांत आपल्याला सवय लागते आणि मग अशा गोष्टीची अंगभूत (ळपीींळपीळल) किमतीबद्दलची व्याख्याच बदलून जाते. यालाच म्हणतात कृत्रिम महागाई, चलनपुरवठा वाढवून तयार होणारी महागाई, ज्यामुळे असलेल्या (तेवढ्याच) पैशाची वाटणी बदलली जाईल, खर्चाच्या दिशा बदलतील. अशा कृत्रिम महागाईपासून समजून उमजून जाणीवपूर्वक लांब राहणं केव्हाही चांगलंच कारण अशी महागाई आपला खिसा रिकामा करते, म्हणजेच गुंतवणूक करू देत नाही. त्यामुळे वेळीच अशा कृत्रिम महागाईपासून चार हात लांब राहणं. कोरोना काळात येत असलेल्या आर्थिक अडचणीत तरी आपल्याकडून करवून घेतल्या जात असलेल्या खरेदीकडे आपले बारीक लक्ष असले पाहिजे.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

या आठवड्यातील ट्रेड

अरविंद फॅशन (Arvind Fashions Ltd)

अरविंद फॅशन लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकने वन वीक टाईम फ्रेममध्ये मल्टिपल बॉटम ब्रेकआऊट व्हॉल्यूम सोबत दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव 197 रुपये आहे.

या शेयरला आपण 190 ते 185 या रेंजमध्ये खरेदी करू शकता. याचा स्टॉपलॉस 170 असेल आणि या स्टॉकची टार्गेट 200/220/240 असतील. (गेल्या शुक्रवारचे बाजारमूल्य दोन हजार 237 कोटी रुपये)

डीएलएफ (DLF)

डीएलएफ या गृहबांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीच्या स्टॉकने मंथली चार्ट टाइम फ्रेममध्ये मल्टीइयर ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेयरला आपण काही महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी सध्याच्या 334 रुपये भावाला खरेदी करू शकता, तसेच 320 रुपयेपर्यंत खाली आल्यास या शेयरला आपण खरेदी करू शकता. या स्टॉकचा स्टॉपलॉस असेल 310 आणि टार्गेट 350, 400 ते 450 असतील. (गेल्या शुक्रवारचे बाजारमूल्य 82 हजार 712 कोटी रुपये)

(सावधानतेचा इशारा- शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये जोखीम ही असतेच, त्यामुळे ज्यांना ट्रेडिंगचा अनुभव आहे, त्यांनीच ही जोखीम घेणे, तसेच स्टॉपलॉस लावल्याशिवाय ट्रेडिंग न करणे अपेक्षित आहे)

-अभिजित पाटील, abhijit.r.patil1995@gmail.com

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply