लांब राहूनही संस्कृती समृद्ध करण्याचे काम -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र भूमीपासून लांब राहूनही मॉरिशस मराठी मंडळाने आपली मराठी संस्कृती ही केवळ जपलीच नाही, तर ती समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 7) केले. मॉरिशस मराठी मंडळातर्फे नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मॉरिशस येथील मराठी कलावंतांची आनंदवारी घेऊन मॉरिशस दूरदर्शनचे अधिकारी अर्जुन पुतलाजी व त्यांच्या गु्रपच्या वतीने नृत्याविष्काराचा पहिला कार्यक्रम पनवेल येथील फडके नाट्यगृहात सोमवारी झाला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक अनिल भगत, अॅड. मनोज भुजबळ, बबन मुकदम, भाजप शहर उपाध्यक्ष नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, अॅड. मनोज म्हात्रे, प्रा. चंद्रकांत मढवी, संस्थेचे अध्यक्ष मोहन भाईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गणेशाचे वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोवाडा, कोळीगीत असे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर झाले. त्यास रसिकांनी दाद दिली. शेवटी महाराष्ट्र गीतावेळी तर नाट्यगृहातील सारे प्रेक्षक उठून उभे राहिले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान झाला.