Breaking News

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला बैठकीत आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समितीची आढावा बैठक गुरुवारी (दि. 29) महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या योजनेबरोबरच राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीस महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त संतोष वारूळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सदस्य सचिव तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार राजश्री जोगी, सदस्य मेघा दमडे, प्रज्ञा चव्हाण, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मंगेश अडसूळ, महापालिका समाजविकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, डेनयूलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात अभियंता गजानन देशमुख, महसूल विभाग अधिकारी उपस्थित होते
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना येणार्‍या अडचणी उपस्थितांकडून जाणून घेऊन त्यावर चर्चा केली. काही महिलांचे बँक खाते जास्त दिवसांपासून वापरात नसल्याने आधार कार्डशी लिंक नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बँकांना मेलद्वारे सूचित करून लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.
लाडकी बहीण योजनेंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व तालुक्यात आजपर्यंत एकूण एक लाख पाच हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झाले होते त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.
या वेळी आदिवासी पाड्यावरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना येणार्‍या अडचणी आमदारमहोदयांनी समजून घेत यावर उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.
उपायुक्त वारूळे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेंतर्गत महापालिकेतील विविध विभागात 52 युवकांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एमआयडीसी तसेच 20पेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या व तीन वर्षापेक्षा जास्त वर्षापासून काम करत असलेल्या विविध कंपन्या, बँका, बांधकाम क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत आस्थापनांशी संवाद सुरू असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आढावा घेताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी आजपर्यंत आठ हजार 655 नागरिकांनी या योजनेंतर्गत अर्ज भरल्याची माहिती दिली. आशा सेविकांच्या मार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत ही योजना पोहचली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply