Breaking News

गोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती

पणजी, पाटणा, बंगळुरू ः वृत्तसंस्था

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गोव्यात एक हजारांहून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे, तर हजारो लोकं बेघर झाली आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पुराचा फटका बसलेल्या लोकांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत. पूरग्रस्त लोकांना राहण्यासाठी सरकारी शाळांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे तसेच खाणे-पिणे आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. बिहारमधील 11 जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 11 लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बिहारमध्ये एनडीआरएफच्या सात आणि एसडीआरएफच्या नऊ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कर्नाटकमध्ये गंगावल्ली आणि काली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कन्नड जिल्ह्याला पुराचा फटका बसला. या भागात भारतीय तटरक्षक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत 100हून अधिक जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. अंकोला तालुक्यातही पूरसदृश्य स्थिती आहे. नदीकाठच्या 15 गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे तसेच गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply