Breaking News

भविष्यात कर्जत विळख्यातच…

कर्जत तालुक्यात दोन मोठी धरणे भविष्यात बांधली जाणार आहेत. सिडको आणि ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जमिनीवर धरणे बांधली जाणार आहेत. लोणावळा भागातील धरणाचे पाणी कातळदरामध्ये सोडल्यानंतर 25 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जातो. मग कोंढाणा आणि पोशिर या मध्यम धरण प्रकल्पांची निर्मिती झाल्यानंतर कर्जत तालुक्यात दरवर्षी येथील जनतेच्या पाचवीला महापूर पूजलेला असेल. त्यामुळे केवळ नदीच्या कडेला गावे असलेली लोकवस्ती सध्या महापुराच्या विळख्यात आहे, मात्र ही धरणे झाल्यानंतर धरणातील वाढीव पाण्याचा विसर्ग दरवर्षी पावसाळ्यात होईल आणि 60 ते 70 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जाईल. हे भाकीत नाही तर भविष्यातील वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे.

उल्हास नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले सुंदर कर्जत शहर. शहराला कवेत घेऊन मध्यातून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा तिचे रूप पाहण्यासारखे असते. रात्री स्ट्रीट लाईट आणि नदी किनार्‍यावरील घरांची लाईट नदीपात्रात पडते, तेव्हा नजर लागावी असे दृश्य असते, परंतु सतत मुसळधार पाऊस पडून पाणी पातळी वाढायला लागली की हीच जीवनवाहिनी अनेकांना धडकी भरवते. किनार्‍यावरील रहिवासी दुकानदार यांच्या पोटात भीतीने गोळा उठतो. 1989, 2005 आणि 22 जुलै 2021 ला नादीचे पाणी शहरात उलटून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

26 जुलै 2005 मध्ये नदीचे पात्र सोडून आमराई येथील रस्ता फोडून प्रचंड वेगाने पाणी कर्जत शहरात शिरून काही कळायच्या आधीच सारे काही उद्ध्वस्त झाले. तत्कालीन माजी आमदार सुरेश लाड यांनी हा नेहमीचा धोका समजून घेऊन राज्य सरकारच्या पूर नियंत्रण कार्यक्रमांमधून दहिवली येथील पायपूल वजा बंधारा तोडून तेथे मोठा बंधारा बांधला आणि नदी संवर्धन करताना माती, दगड बाहेर काढून उल्हास नदीचे पात्र खोल केले. उल्हास नदी पात्रात साठलेला हजारो ट्रक गाळ उपसला, नदीतील अतिक्रमण काढून पात्राची रुंदी आणि खोली वाढवली. कर्जत दहिवलीला जोडणारा ब्रिटिशकालीन बंधारावजा पायपूल यामुळे पाणी अडून विसर्ग होण्यास जो अडथळा निर्माण होत होता, तेथे नवीन पूल बांधला. पुरामुळे जेथे नदी उलटण्याची शक्यता असते त्या आमराई परिसरात नदीला संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. अनेक वर्षे पुराच्या पाण्याला थोपवून धरण्यात यश आले.

परंतु मागील आठवड्यात तीन दिवस संततधार पडणारा मुसळधार पाऊस आणि 22 जुलैच्या रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे काही तासात पडलेला 231 मिलिमीटर पाऊस यामुळे प्रचंड वेगात पाणी पातळी वाढू लागली.रात्री एक वाजणेच्या सुमारास नगरपरिषदेने भोंगा वाजवून येऊ घातलेल्या भयाण परिस्थितीची कल्पना लोकांना दिली.काही लोक निर्धास्तपणे घरात झोपले होते.जर नगरपरिषदेने त्यांना सावध केले नसते तर अनेकांचा अंथरुणातच मृत्यू होऊन विदारक स्थिती निर्माण झाली असती.रात्री अचानक पाणी पातळी वाढून काही मिनिटातच कोतवाल नगर, म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, आमराई, बामचा मळा परिसरातील घरे दुकाने यात पाच सहा फूट पाणी शिरून काही कळायच्या आताच डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले.दरवर्षी येणारा पूर आणि लोकांचे होणारे नुकसान यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी याकरिता काय करावे याबाबत नगरपरिषदेने तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल मागवणे गरजेचे आहे. नदीपात्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्या आहेत. सर्वात प्रथम प्रवाहास अडथळा करणार्‍या या जलपर्णी काढून नदी साफ केली पाहिजे.ज्याठिकाणी नदी उलटते तेथील गाळ काढून पात्र खोल आणि रुंद करावे. मुद्रे स्माशनभूमी पासून मुद्रे गावा पर्यंत असणारा खडक फोडून जेथे नदी वळण घेते त्या लघुपाटबंधारे विभाग वसाहतीमागील भागातील नदीचे वळण मोठे करावे. याप्रमाणे उपाय केल्यास येणारे पाणी पुढे वेगात जाऊन शहरात पाणी उलटण्याची शक्यता कमी होईल. संततधार पाऊस असताना पाणी पातळी वाढल्यानंतर गणपती मंदिरा शेजारी असणार्‍या नाल्यातून पाणी नदीत जात नाही. या ठिकाणी नदीपात्राची उंची कमी असल्याने शहरातून येणारे मुख्य नाल्यातील पाणी कोतवाल नगर म्हाडा कॉलनी पर्यंत पसरते. शहरातून  येणारे काही पाणी नगरपरिषद कार्यालयाकडून पुढे मुद्रे समशानभूमी कडे सोडल्यास जास्त योग्य राहील. याबाबत काय उपाययोजना कराव्या याची माहिती नागरिक आणि तज्ञांकडून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी.

साधारणतः जून जुलैमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि याच दरम्यान सर्वत्र पूर येतो. लोणावळा खंडाळा आणि त्या परिसरातील डोंगरदर्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग उल्हासनदी पात्रात होतो.त्यात खोपोली येथील टाटाच्या वीज प्रकल्पासाठी लोणावळा भागात असलेल्या टाटा च्या धरणातील पाणी खोपोली बरोबर कर्जत तालुक्यात सोडण्याची व्यवस्था आहे.धरण क्षेत्रात अधिक पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाण्याचा विसर्ग करताना लोणावळा भागातून ते पाणी खंडाळा  येथून कातळदरा भागात सोडले जाते. त्यामुळे दरवर्षी कर्जत तालुक्यात उल्हासनदीची पाणी पातळी अनेकदा वाढते. लोणावळा भागातील धरणातील पाणी कर्जत भागात सोडले जाते,याला स्थानिकांनी दुजोरा दिला आहे.कारण उन्हाळ्यात ही उल्हास नदी कोरडी असते आणि त्यामुळे वासरे परिसरात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन स्थानिकांनी कातळदरा भागातून लोणावळा गाठले होते. त्यावेळी लोणावळा येथून काही पाईप आलेले दिसून आले, त्या पाईप मधून पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग होतो हे त्यांचे म्हणणे आहे. त्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यात वाहणार्‍या उल्हास नदीला पूर येतो आणि कर्जत शहर तसेच उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये महापूराचे पाणी शिरत असते. कर्जत शहरापासून पुढे मालवाडी, बार्डी, वावे, बेडसे, चांदई, नेवाळी, कोल्हारे, कोल्हारे वाडी, तळवडे, हंबरपाडा, धामोते, मालेगाव, दहिवली, बिरदोले या गावात पुराचे पाणी शिरत असते. यावर्षी त्याशिवाय अनेक गावांत महापूराचे पाणी शिरले. त्यात माथेरानच्या डोंगरातील पाणी नेरळ, भडवळ, दामत, शेलू या भागासाठी धोकादायक बनत असते. यावर्षी नेरळ गावातील 40 टक्के भाग पाण्याखाली होता.

कोंढाणा, पोशिर धरण नको रे बाबा?

कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या कोंढाणा धरणाचे काम लवकर झाले तर या धरणाचा आवाका पाहता आणि धरण मध्यम स्वरूपातील असल्याने डोंगरदर्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील धरण भरण्यास ऑगस्ट सप्टेंबर उजाडेल. मात्र तरी देखील धरण ओव्हर फ्लो होण्याच्या स्थितीत जात असेल तर धरणातील पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे जुलै महिन्यापासून पाऊस चार दिवस सतत पडत राहिला तर नियोजित कोंढाणा धरणातील पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्याचा फटका दरवर्षी कर्जत तालुक्यातील 50 टक्के हुन अधिक गावांना बसू शकतो. कारण उल्हासनदीच्या तीरावर आणि आसपास कर्जत तालुक्याचा अर्धा भाग वसला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आणि आधी कर्जत शहराची अवस्था बिकट करीत धरणातील विसर्ग केलेले पाणी कर्जत तालुक्यातील गावांची वाट लावत जाणार् यात शंका नाही. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण या महानगरासाठी पोशिर धरण बांधण्याचे नियोजन आहे. कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे पोश्री नदीवर हे धरण भविष्यात बांधले जाणार आहे. त्यावेळी बोरगाव येथील उंबरखांड पासून मानिवली पर्यन्तच्या गावांना महापुर दरवर्षी आपलेसे करील. पोशिर धरणातील पाण्याचा विसर्ग केला की मग या नदीकिनारी असलेली गावे महापुरात दुबणार? हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे कर्जत तालुक्याला भविष्यात ही धरणेच डुबविणार यात शंका नाही.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply