पनवेल ः रामप्रहर वृत्त
नॅशनल युथ स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने आयोजित नॅशनल युथ गेम्स चॅम्पिशियन 2021 या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिहीरचा सत्कार करण्यात आला. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया, फिट इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एमवायएएस यांच्या वतीने गोवा येथील नेहरू स्टेडियममध्ये तिसर्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन स्पर्धेत 20 वर्षाखालील एकेरी गटात मिहीर परदेशी याने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. मिहीर हा सीकेटी महाविद्यालयाचा टीवायबीकॉमचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. म्हणूनच या सुवर्ण कामगिरीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्हाटे, पुणे विद्या भवनचे प्रा. दीपक निचित यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिहीरचे अभिनंदन केले.