Breaking News

उद्ध्वस्त कोकण!

निसर्गसंपन्न कोकण सध्या याच निसर्गाची अवकृपा झेलत आहे. महापूर तसेच दरडी कोसळून कोकणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील सरकारने आता या आपद्ग्रस्तांना भरीव मदत करून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

जुलै महिन्याच्या सुुरुवातीला गायब झालेल्या वरुणराजाने असे जोरदार पुनरागमन केले की अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. राज्यात सर्वदूर पाऊस पडला. कोकणात तर अतिवृष्टी होऊन सारे काही वाहून गेले. हे कमी म्हणून काय दरडींनी घात केला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावात दरड कोसळून 40हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण ढिगार्‍याखालीच असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी एनडीआरएफकडून शोधकार्य अद्याप सुरूच आहे. महाडच्या शेजारील पोलादपूर तालुक्यातही दरडी कोसळण्याच्या दोन घडना घडल्या. यातील केवनाळे येथे सहा जणांचा, तर गोवेले येथे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. कोकणासह राज्यात इतरही दरडी कोसळून अनेकांचा जीव गेला आहे, पण रायगडातील जीवित हानी अधिक आहे. जिल्ह्याचा दक्षिण भाग डोंगरांनी व्यापलेला आहे. तेथे पावसाळ्यात दरडी कोसळून दुर्घटना घडण्याची टांगती तलवार असते. 2005मध्ये झालेेल्या अतिवृष्टीमध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांमध्ये दरडी कोसळून अनेक घरे गाडली गेली. यात 212पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या की त्या वेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. हळहळ व्यक्त केली जाते. आश्वासनेही दिली जातात. नंतर मात्र पुढील दुर्घटना घडेपर्यंत सारे काही शांत असते. मुळात अशा दुर्घटना का होतात, त्या घडू नये आणि घडल्याच तर जीवित हानी होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर राज्य शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. अतिवृष्टी, डोंगरांचे उत्खनन, बेसुमार वृक्षतोड, डोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणे ही दरडी कोसळण्याची प्रमुख कारणे आहेत. जी नैसर्गिक कारणे आहेत ती टाळता येणार नाहीत, परंतु जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. रायगड जिल्हा प्रशासनाकडून 20 गावांमध्ये संरक्षक भिंती उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याबाबत शासनाने हालचाली केल्या पाहिजेत. दरडग्रस्त गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हायला हवे, मात्र ते होताना दिसत नाही. ही बाब लांबचीच आहे. आता ज्या तळीयेत दुर्घटना घडली तिथे यंत्रणा दुसर्‍या दिवशी पोहचली. या आपत्तीग्रस्तांना वेळीच मदत मिळाली असती तर काही जीव वाचले असते, मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. गेलेल्यांना परत तर आणता येणार नाही, पण वाचलेल्यांचा आधार द्यायला हवा तसेच यापुढे अशा दुर्घटना घडू नये या दृष्टीने प्रयत्न करणे काळाची गरज आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची हीच बाब तळीयेत अधोरेखित केली. त्यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची घोषणादेखील केली. आता राज्य सरकारनेही आपली जबाबदारी स्वीकारून काम करणे अपेक्षित आहे. कोकणाने महाराष्ट्राला सदैव भरभरून दिले आहे. आता वेळ कोकणाला आधार देण्याची आहे. मुख्यमंत्री महोदयांनी केवळ आश्वासने न देता कोकणवासीयांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी जे जे लागेल ते देणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply