Breaking News

पनवेल महापालिका गरजूंना पुरवणार मोफत आरोग्य सुविधा

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहेत. त्यामध्ये गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफी, मोफत रक्तपुरवठा, टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्सरेची सुविधा असणार आहे. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना वास्तव्याचा पुरावा दिल्यावर या सुविधा मिळणार आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात नागरिकांना लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य केंद्र उभी करण्याचे आव्हान होते. आरोग्य केंद्र उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करणे, आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र चालविण्यासाठी आवश्यक कर्मचार्‍यांची एनयुएचए अंतर्गंत नेमणूक करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पनवेल महापालिका क्षेत्रात तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन नागरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. किरकोळ आजारांवर या उपकेंद्रांमधून सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळणार असल्यामुळे केंद्र फायदेशीर ठरणार आहेत. याशिवाय गर्भवतींसाठी सोनोग्राफी आणि मोफत रक्तपुरवठा करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. पूर्वीच्या सहा आरोग्य केंद्रांजवळील खासगी लॅबमध्ये सोनाग्राफी मोफत काढता येणार आहे तसेच गरज भासल्यास मोफत रक्तपुरवठा देखील केला जाईल.
खांदा कॉलनीतील रोटरी ब्लडबँक आणि साई ब्लडबँक या दोन रक्तपेढ्यांमधून मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे. याचा खर्च पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जाणार आहे. महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांमध्ये दर गुरुवारी येणार्‍या 40 ते 50 गरोदर मातांना याचा लाभ होऊ शकतो. आरोग्य केंद्राची संदर्भ चिठ्ठी असल्यास महापालिकेशी करारनामा केलेल्या लॅब संबंधितांची कोणतेही शुल्क न आकारता तपासणी करणार आहेत. याशिवाय खासगी प्रयोगशाळांमध्ये आजारांचे निदान होण्यासाठी केल्या जाणार्‍या तपासण्यांची माहिती महापालिकेला मिळावी म्हणून महापालिकेने विकसित केलेले सॉफ्टवेअरवर दररोज टाकणे लॅबना बंधनकारक असणार आहे. टीबी संशयित रुग्णांचे मोफत एक्सरे काढण्यात येणार आहेत. खासगी लॅबमध्ये 400 ते 450 रुपये येणारा खर्च रुग्णांना महापालिकेकडून मोफत केला जाणार आहे. त्यामुळे गर्भवती मातांसोबत संशयित टीबी रुग्णांसाठी मोफत सुविधा महापालिका देणार आहे.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply