Breaking News

मनपाच्या करप्रणालीत राजकारण आणू नका; सभापती संतोष शेट्टी यांचे विरोधकांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. पनवेल महापलिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी प्रसिद्धीपत्रक काढून, कर का आवश्यक आहे याबाबत भूमिका मांडली आहे. शेट्टी यांनी केलेल्या आवाहनात पनवेल शहर वगळता महापालिका क्षेत्रात सर्व वसाहती सिडकोने वसविलेल्या आहेत, तसेच 23 ग्रामपंचायती विसर्जित करून या ग्रामपंचायतींचा कारभार महापालिकेच्या ताब्यात दिला आहे. पनवेल शहर म्हणजेच पूर्वीची नगर परिषद आणि ग्रामपंचायतीत मालमत्ता कर नागरिक वर्षानुवर्षे भरीत आहेत. किरकोळ सेवा शुल्क देणार्‍या सिडकोने सुविधादेखील सेवा म्हणूनच दिल्या आहेत. सिडकोने जबाबदारी म्हणून सुविधा दिल्या नाहीत. सिडकोची जबाबदारी फक्त शहर निर्माण करण्याची असून लोकसंख्येनुसार सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकांची असते. पनवेलची लोकसंख्या भाजपच्या कार्यकाळात महापालिका स्थापन करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्यामुळे महापालिका स्थापन करण्यात आली. महापालिकेची स्थापना झाली की नागरिकांची आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, पाणी, रस्ते, शिक्षण, परिवहन व्यवस्था आदी जबाबदारी महापालिकेवर येते. या सगळ्या सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेला कर हेच एकमवे उत्पन्न असते ही बाब मला स्थायी समिती सभापती म्हणून लक्षात आली आहे. राज्य सरकार महापालिकांना निधी देण्यास फारसे अनुकूल नसतात. त्यामुळे कराच्या माध्यमातून महापालिका स्वयंपूर्ण करणे यापलीकडे कोणताही मार्ग नसतो. त्यामुळेच पनवेल महापालिकेचे प्रशासन महापालिका क्षेत्रात कर प्रणाली राबवून महापालिकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपले शहर वेगाने विकसित व्हावे असे वाटत असेल तर कर भरून विकासाला हातभार लावणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या दिशाभूल करणार्‍या आवाहनाला बळी न पडता संविधानाने लागू केलेल्या कर भरून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मतही शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
…अन्यथा भविष्यात नकरात्मक परिणाम!
सिडको वसाहतीतील घनकचरा व्यवस्थापन महापालिकेने हस्तांतरण करून घेतल्यानंतर 110 किलोमीटर चौरस किमीचे शहर कचराकुंडी मुक्त होण्याच्या वाटेवर आहे. सिडकोकडे घनकचरा व्यवस्थापन असताना कचर्‍याच्या ढीग पडल्यामुळे नगरसेवकांना आंदोलन करण्याची वेळ येत असे. सर्व सोयीसुविधा टप्प्याटप्प्याने महापालिकेकडे आल्यास शहर अल्पावधीतच स्वयंपूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांनी कर भरा; अन्यथा याचे भविष्यात चुकीचे पडसाद उमटून आपले शहर, परिसर, गावाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतील, अशी भीतीही पनवेल महापलिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply