नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेकरीता डॉक्टर व इतर कर्मचारी मनुष्यबळ पुरविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे.
भगत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच धर्तीवर या विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना केली जात आहे, मात्र पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पाहता रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाची सद्यस्थिती पाहता 140 कोरोनाबाधित रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असल्याचे दिसून आले आहेत. त्यापैकी ऑक्सिजन – 60 रुग्ण, आसीयू – आठ रुग्ण इतके रुग्ण सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या उपचाराकरीता कमीत कमी दोन फिजीशिअन, दोन भुलतज्ञ, तसेच 10 वॉर्ड बॉय, दोन औषधनिर्माता एवढ्या मनुष्यबळाची गरज असून, सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात एक फिजीशिअन गेले चार महिन्यांपासून एकट्याच कार्यरत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ पुरविल्यास कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल. सद्यस्थितीत नवी मुंबईच्या रुग्णालयात भूलतज्ञ व फिजीशिअन 2.50 लक्ष एवढे मानधन घेत असून, त्याच मानधनावर आपल्या उपजिल्हा रुग्णालयात मानधन दिल्यास ते उपजिल्हा रुग्णालयांत काम करण्यास उपलब्ध होऊन त्यांनादेखील दिलासा मिळेल.
या विषयाचे महत्त्व लक्षात घेता, आपण आपल्या स्तरावर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरीता डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांची मनुष्यबळ पुरविण्याकरीता उपाययोजना करावी.