Breaking News

पूरामुळे उद्योगांचे सर्वाधिक नुकसान

महाड एमआयडीसीला अतिवृष्टीचा फटका

अलिबाग ः प्रतिनिधी

महाड तालुक्यात आलेल्या पुराचा फटका जसा सर्वसामान्य नागरिक, व्यापार्‍यांना बसला तसा तो उद्योगांनाही बसला आहे. पुरामुळे महाड एमआयडीसीतील उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक उद्योग पुढील महिना दीड महिना तरी सुरू होतील की नाही याबाबत शंका आहे.

महाड एमआयडीसीत छोटे 140, मोठे 25 आणि मध्यम 10 असे मिळून जवळपास पावणे दोनशे उद्योग आहेत. पुराच्या पाण्यात यातील बहुतांश उद्योग बाधित झाले. पहिल्यांदाच या एमआयडीसीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अनेक उद्योगांमध्ये 10 ते 12 फुटांपर्यंत पाणी होते. त्यात कंपन्यांमधील यंत्रसामग्रीबरोबरच कच्चा माल आणि तयार माल पाण्याखाली गेला होता. हा माल भिजून वाया गेला आहे. कामगार जवळपास 48 तास अडकून पडले होते. तेवढाच वेळ यंत्रसामग्रीही पाण्याखाली होती. आजही अनेक कंपन्यांमध्ये चिखल साचलेला आहे. तो साफ करण्याचे काम सुरू आहे.

दुसरीकडे पाण्यात भिजून नादुरूस्त झालेली यंत्रसामग्री दुरूस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाड एमआयडीसीतील जवळपास 50 ते 60 उद्योगांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे कायमस्वरूपी आणि कंत्राटी मिळून 20 हजार कामगार, कर्मचारी काम करतात. या ठिकाणचा वीजपुरवठा अजूनही बंद आहे. जनरेटरदेखील बंद असल्याने वीजपुरवठा होत नाहीए. तो सुरळीत व्हायला आणखी काही दिवस जातील. त्यामुळे अनेक उद्योग लवकर सुरू होतील अशी स्थिती नाही. परिणामी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत महाड मन्यू फ्रॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी पठारे यांनी सांगितले की, यापूर्वीदेखील एमआयडीसीने अतिवृष्टी, पूर अनुभवले आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. एवढा पूर येईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. 2005 नंतर 2019मध्येदेखील पूराचे पाणी एमआयडीसीत शिरले होते, मात्र यंदाचा पूर भयानकच होता. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. यातील नुकसानीचा आकडा आजच सांगता येणार नाही. तरीही वेगवेगळ्या उद्योगांत मिळून 600 ते एक हजार कोटींच्या घरात हे नुकसान जाऊ शकते.

या महाभयंकर पुरात लहान-मोठ्या 60 उद्योगांना मोठा फटका बसला. अंदाजे 600 ते 1000 कोटींचे नुकसान आहे. बहुतांश उद्योग लवकर सुरू होण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. या पुरामागची कारणे शोधण्याची गरज आहे.

-संभाजी पठारे, अध्यक्ष, महाड मॅन्युफ्रॅक्चरर्स असोसिएशन

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply