Breaking News

शुभ वर्तमान! पनवेलचा पाणीपुरवठा होणार सुरळीत

पनवेल : बातमीदार

दमदार पावसामुळे पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांना आता दररोज पाणी मिळणार आहे. पाऊस असाच राहिल्यास शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत.

पनवेल शहराला लागणार्‍या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून 12 ते 15 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. डिसेंबर 2018मध्ये हे पाणी संपल्याने शहरात फक्त एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. परिणामी सहा महिन्यांपासून पनवेलकरांना दिवसाआड पाणी येत होते. 3.57 दशलक्ष

घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेले देहरंग धरण पहिल्या पावसातच भरले. त्यामुळे सोमवारपासून महापालिकेने शहरात दररोज पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि एमआयडीसी यांच्यासोबतच देहरंग धरणातून पाणी उपलब्ध होणार असल्याने पनवेलमधील पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वास महापालिका पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित होण्याच्या अडचणी, एमजेपीचे शटडाऊन वगळता सुरळीत पाणी मिळणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply