मुंबई : प्रतिनिधी
देशातील हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावणी देणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वारिस पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ झाले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) बोलताना त्यांनी ’स्वातंत्र्य मागून मिळणार नाही. हिसकावून घ्यावे लागेल. त्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल. आम्ही 15 कोटी असलो, तरी 100 कोटींवर भारी आहोत,’ असे पठाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर गदारोळ उठला. त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रारीही करण्यात आल्या. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पठाण यांनी आपले वक्तव्य मागे घेतले, मात्र त्यांच्यावर टीका सुरूच आहे. ’पठाण यांनी माफी मागायला हवी होती. तसे झाले असते, तर बरे झाले असते. ते औरंगजेबाचे वारिस झाले आहेत, पण त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील. जनता त्यांना माफ करणार नाही,’ असेही मुनगंटीवार म्हणाले.