Breaking News

‘कोरोना‘च्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय आला अडचणीत; सायबर सेलकडे तक्रार

पुणे ः प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील 15 दिवसांत बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील 10 दिवसांत 1100 मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दिनांक 4 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत सुमारे 150 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, ही अफवा पसरविणार्‍यांविरुध्द आता पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. भारतामध्ये कोंबडीच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव होत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवली जात आहे. त्याचा फटका थेट या व्यवसायाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

या वेळी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, वेंकीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते.

कोंबडीद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. अफवा पसरविणार्‍यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करतील. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांनाही बसला आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या वेळी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply